पुणे : भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस बारी यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. मात्र, आरोपी आहुजा याच्या जामीन अर्जावर येरवडा पोलिसांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढीची मागणी केल्याने आहुजा याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा (वय 25) या तरूणानं भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसंच अश्लील कृत्य केलं होतं. येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यानंतर दोघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र गौरव आहुजा याने केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी येरवडा पोलिसांनी मुदतवाढीची मागणी केली. तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याचा गुन्ह्यातील सहभाग अत्यल्प आहे.एफआयआर मध्ये नमूद केल्यानुसार तो कारमध्ये बसला होता आणि त्याने रस्त्यावर लघुशंका केली नाही. आरोपी तपासासाठी केव्हाही उपलब्ध होईल. त्यामुळे तो जामिनासाठी पात्र ठरतो असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून अॅड. पुष्कर दुर्गे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन् भाग्येश ओसवाल याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.