ट्रकचालकांना लुटणारी टोळी खेड शिवापूर येथे गजाआड
By Admin | Updated: May 30, 2014 04:42 IST2014-05-30T04:42:56+5:302014-05-30T04:42:56+5:30
येथे (ता. २८) पुणे-सातारा हायवेवर रात्री-अपरात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांची लूटमार करणार्या टोळीला राजगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली

ट्रकचालकांना लुटणारी टोळी खेड शिवापूर येथे गजाआड
खेड शिवापूर : येथे (ता. २८) पुणे-सातारा हायवेवर रात्री-अपरात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांची लूटमार करणार्या टोळीला राजगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. लूटमार करणार्या टोळीने बुधवारी रात्री दीडच्या सुमारास वर्वे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरचालक नाना वाघमोडे (वय २९, रा.एखतपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांस चाकूचा आणि काठीचा धाक दाखवला. त्याला गाडीपासून दोनशे मीटर लांब बाजूला नेले. त्या ठिकाणी त्याच्याजवळ असलेला मोबाईल व रोख रक्कम साडेचार हजार जोर जबरदस्तीने काढून घेऊन त्यांनी सातारा बाजूच्या दिशेने धूम ठोकली. त्या ट्रकचालकाने लगेचच दुसर्या ट्रकचालकाडून मोबाईल घेतला आणि १०० क्रमांकावर कंट्रोल रूमला पोलिसांशी संपर्क साधला. राजगड पोलिसांना कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच खेडशिवापूर टोलनाक्यावर तपासणी सुरू केली. काही वेळातच त्या ठिकाणी दोन दुचाकीवरून पाच जण आले. समोर पोलिस तपास करीत असल्याचे त्या पाच जणांच्या लक्षात आल्यानंतर ते तेथून पळून जावू लागले. पोलिसांनी प्रसंगावधान साधून ते पाच जण संशयास्पद वाटल्यामुळे पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. अटक केल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांचा इतर गुन्ह्यांशी संबध असल्याची दाट शक्यता आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक शाहूराव साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.(वार्ताहर)