पारगाव मेमाणे येथे घरात घुसून टोळक्याची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:15+5:302021-08-23T04:14:15+5:30
जेजुरी: ट्रॅक्टरची साईड न दिल्याने पारगाव मेमाणे येथे हत्यारांसह एका कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण, तसेच वाघापूर-चौफुल्यावर हत्यारांसह ...

पारगाव मेमाणे येथे घरात घुसून टोळक्याची मारहाण
जेजुरी: ट्रॅक्टरची साईड न दिल्याने पारगाव मेमाणे येथे हत्यारांसह एका कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण, तसेच वाघापूर-चौफुल्यावर हत्यारांसह नंगानाच करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १५ जणांच्या टोळक्यावर जेजुरी पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. यातील १३ जणांना अक्षरशः कोंबिंग ऑपरेशन करीत ताब्यात घेतले आहे
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल (दि. २१) दुपारी पारगाव मेमाणे गावच्या हद्दीत रस्त्यावर ट्रॅक्टरने लवकर साईड दिली नाही म्हणून सचिन मेमाणे आणि आदित्य कळमकर आणि आदित्य चौधरी यांच्यात बाचाबाची झाली होती. याचा राग मनात धरून या दोघांनी त्यांचे इतर १३ साथीदारांना बोलावून काल रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सचिन मेमाने यांच्या घरावर दगड मारीत हल्ला केला. घरात घुसून तलवारी, लोखंडी कोयते, हॉकी स्टिक, लाकडी दांडकी, पिस्तूल आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात सचिन मोहन मेमाणे, भाऊ नीलेश मोहन मेमाणे, वडील मोहन मेमाणे, आई मंगल मोहन मेमाणे, मामा संतोष हे जखमी झाले आहेत. गावातील आजूबाजूचे लोक गोळा झाल्याने टोळक्याने पलायन केले. गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता टोळक्यातील एकाने गणेश रामदास मेमाणे यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. या टोळक्याने यावर न थांबता जवळच असणाऱ्या वाघापूर चौफुला येथे तलवारी नाचवत चौकातील दुकाने बंद करून दहशत निर्माण केली.
यासंदर्भात, सचिन मोहन मेमाणे यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पलायन केल्याने जेजुरी पोलिसांनी सासवड आणि राजगड पोलिसांची मदत घेऊन कोंबिंग ऑपरेशन राबवले. यात एकूण १५ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी भोर तालुक्यातील अभिजित विजय भिलारे, रा भिलारेवाडी, वैभव बबन थिटे रा. हातवे, फारुख हमीद शेख रा. भांबवडी, हितेश सुरेश मानकर, आणि गणेश दशरथ गाडे दोघेही रा कापूरहोळ, ऋतिक दिनेश दामोदरे रा. कसबा बारामती, श्रेयस संपत थिटे रा. वीर, ता. पुरंदर तसेच एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आदित्य भगवान कळमकर, (रा. बेलसर) आणि आदित्य तानाजी चौधरी (रा. नारायणपूर ता. पुरंदर) तसेच सागर वायकर (रा. पिसर्वे), हर्षद भोसले (रा. कोडीत) गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट (रा. पिंपळे), हरी बाळू कुदळे (रा. पारगाव, सर्व ता. पुरंदर) आणि बंडा उर्फ अनिकेत संपत शिंदे (रा. खडकी, ता. भोर) हे आरोपी अद्यापही फरार आहेत. ज्यांनी सार्वजनिक व्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कडक शासन होणार आहे. नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. अफवांवरही कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
सर्व आरोपींवर यापूर्वी ही विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.