पुणे : जगभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आपण जवळचे लोक गमावले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन भर देत, तसेच सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला जाईल, अशी भूमिका मंडळांनी घेतली आहे. पुणे महापालिकेत गणेशोत्सव पूर्वतयारी २०२१ या मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंडळांच्या अध्यक्षांनी आपली मते मांडली आहेत.
दीड वर्षात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. कोरोनाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळांना झीरो बजेट कार्यक्रम द्यावेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियमांबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी, असा सूर या वेळी व्यक्त झाला. गणेशोत्सव महिन्यावर आला आहे. वैभवशाली उत्सवावर कोरोनाचे सावट अजूनही आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंडळांची बैठक घेण्यात आली होती. गणेशमूर्ती विसर्जनावर या बैठकीत महत्त्वाची भूमिका मांडली.
कार्यकर्ते म्हणाले की, महापालिकेने मूर्तिदान या उपक्रमाचा विचार करावा. त्यांचे स्टोअरेज करण्याची तयारी करावी. तसेच, लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. शहरातून साडेचार लाख मूर्ती विसर्जन होत असतात. त्यसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
परिस्थिती पाहून ऑनलाईन कार्यक्रम
गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणारच आहे. पण, असंख्य कार्यक्रम, शिबिरे ही जर ऑनलाइनच्या माध्यमातून राबवली आणि गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला, तरी यू-ट्यूब, फेसबुकवर हे कार्यक्रम वर्षानुवर्षे राहतात. त्यानुसार या कार्यक्रमांवर भर द्यावा.
पोलीस, प्रशासनात तफावत
शहरात जास्तीत जास्त निर्बंध असतात. उपनगरांत त्या तुलनेत निर्बंध वाढवण्याची गरज लागत नाही. प्रशासन नियम वेगळे सांगते. पोलिसांकडून नियम अजून कडक केले जातात. दोघांच्यात तफावत नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भजन, कीर्तने, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाला परवानगी मिळाली आहे. त्यासाठी नियमावली जाहीर करावी.
“पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे महापालिका स्वागतच करत आहे. मंडळांना उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. २०१९ला जे परवाने देण्यात आले होते, तेच या वर्षी चालणार आहेत. कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज भासणार नाही. तसेच, मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम हौद वाढवण्याबरोबरच, गणेशमूर्ती विसर्जनसाठी लागणाऱ्या पावडर मुबलक प्रमाणात मागवण्यात आली आहे. तसेच, शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, मैदाने आणि मोकळ्या जागेत पाण्याचे हौद बांधण्यात येणार आहेत,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
“पुणे शहरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना सहकार्य केले जाईल. मंडळांनीही समाजभान ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करावा,” असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.