निधीच्या वर्गीकरणावरून जुंपली
By Admin | Updated: July 16, 2014 04:05 IST2014-07-16T04:05:28+5:302014-07-16T04:05:28+5:30
वारजे येथील नाट्यगृह उभारण्यासाठीचा दोन कोटींचा निधी सिंहगडच्या विकासासाठी वळविण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली

निधीच्या वर्गीकरणावरून जुंपली
पुणे : वारजे येथील नाट्यगृह उभारण्यासाठीचा दोन कोटींचा निधी सिंहगडच्या विकासासाठी वळविण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. त्यामुळे वारज्यातील राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांत निधीवरून वाद सुरू आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात वारजे येथे नाट्यगृह उभारण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, प्रभाग-३१मधील नाट्यगृहाची जागा ताब्यात न आल्यामुळे, दोन कोटींचा निधी सिंहगड येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर स्वराज्य निष्ठा शिल्प उभारण्यासाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक दिलीप बराटे यांनी दिली होता. परंतु, अंदाजपत्रकातील निधी प्रभाग ३१ साठी नसून, वारजे परिसरात नाट्यगृह उभारण्यासाठी होता. त्यानुसार प्रभाग ३० मध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध असताना, बराटे यांनी परस्पर निधी वर्गीकरणाचा प्रस्ताव दिल्याचा आक्षेप नगरसेवक सचिन दोडके यांनी घेतला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणाचा प्रस्ताव मंगळवारी मंजूर झाला. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांत वाद वाढला आहे. त्याविषयी दोडके म्हणाले, वारजे येथील अदित्य गार्डनमागे नाट्यगृहासाठी अॅमिनीटी स्पेस उपलब्ध आहे. त्याठिकाणी नाट्यगृह उभारता येणे शक्य असताना स्थायी समितीमध्ये गुपचूप
प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे मुख्य सभेत वर्गीकरणाला विरोध होणार आहे. (प्रतिनिधी)