निसर्गाचं भरभरून दान लाभलेला मुळशी

By Admin | Updated: December 27, 2014 22:56 IST2014-12-27T22:56:16+5:302014-12-27T22:56:16+5:30

मावळ हे सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेले हे तालुके. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे,

Fundamental fundamentalist | निसर्गाचं भरभरून दान लाभलेला मुळशी

निसर्गाचं भरभरून दान लाभलेला मुळशी

पुणेंशहराच्या पश्चिमेकडील भोर, मुळशी, वेल्हा व मावळ हे सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेले हे तालुके. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे, तसेच निसर्गाचं भरभरून दान लाभलेले तालुके म्हणूनही या तालुक्यांकडे पाहिले जाते. यातील पुणे शहराला सर्वांत जवळचा असणारा व निसर्गसौंदर्याच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील काश्मीर अशी वेगळी ओळख असलेला मुळशी हा तालुका होय. मुळशीचा निसर्ग अवघ्या जगभरातील शहरवासीयांना पर्यटनासाठी भुरळ घालताना दिसतो आहे. बारमाही हिरव्यागार वृक्षराजीने आच्छादलेल्या उंचच्या उंच पर्वतरांगा.. पुणे शहराला व पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाला वर्षभराचे पाणी पुरविण्याची क्षमता असलेले टेमघर, वरसगाव व मुळशी यांसारखी महाकाय धरणं.. मुळा-मुठा यांसारख्या वर्षभर वाहणाऱ्या प्रदूषणविरहित नद्या.. मावळ-मुळशीच्या सीमेवर उभे असलेले व शिवरायांच्या इतिहासाची ओळख करून देणारे तुंग, तिकोना यांसारखे किल्ले... यामुळे साहजिकच इथल्या निसर्गाची शहरवासीयांना भुरळ पडल्यावाचून राहत नाही. इंद्रायणी, आंबेमोहोर यांसारख्या भाताचा आगार व हापूस, रायवळ यांसारख्या आंब्याचा उत्पादक तालुका म्हणूनही मुळशीची ओळख मुंबई व पुणे शहराला आहे. पुणे-महाड महामार्गावरून जात असताना ताम्हिणी घाट परिसरात आपल्याला निसर्गाची विविध रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात. एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे व दुसऱ्या बाजूने असलेल्या खोल दऱ्या. पावसाळ्यात कोकणच्या बरोबरीने धो-धो पडणारा पाऊस, हिवाळ्यामध्ये दाट धुक्याची शाल पांघरून सजलेले डोंगर, भर उन्हाळ्यातही आपल्या विशाल जलपात्राने गारव्याचा सुखद अनुभव देणारे मुळशी धरणाचे पाणी. याच परिसरात असणारा पळसे येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची रीघ लागते. उन्हाळ्यात करवंद , जांभळ , रानसफरचंद यांसारखा रानमेवा आपल्याला मनसोक्त चाखता येतो. भव्य गृहप्रकल्पाबरोबरच चिन्मय विभूती, हाडशी यांसारखी आध्यात्मिक केंद्रे, शेती पर्यटन केंद्रे तसेच मल्हारमाचीसारखा महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या सहकार्याने जलसृष्टी प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आहे. तालुक्याच्या पश्चिम टोकाला आपण गेलो की, एका उंच ठिकाणी आपण पोहोचल्याचा अनुभव येतो. पावसाळा व हिवाळ्यात धुक्याच्या दुलईत लपून बसलेला तळकोकण आपणाला उन्हाळ्यामध्ये याच ठिकाणावरून डोळे भरून पाहता येतो. पर्यटकांची राहण्याची व खाण्याची हौस भागविण्यासाठी अनेक नामांकित व्यावसायिक मंडळींनी तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल सुरू केली आहेत. दररोजच्या कामाच्या व्यस्ततेतून एक दिवस तरी विरंगुळा मिळावा यासाठी शनिवार-रविवार या दिवशी अनेक पर्यटक या भागात येऊन जातात.
शहरवासीयाचं सेकंड होम शहरातील दगदग, प्रदूषण, रहदारी या सर्व समस्यांतून आठवड्यातून एकदा तरी आराम मिळावा, या हेतूने अनेक जण भाड्याची घरे घेऊन अथवा स्वत:चं घर घेऊन राहण्यासाठी अलीकडे मुळशीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे या भागात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे गृहप्रकल्प उभे राहताना दिसत आहेत. याशिवाय निसर्गाच्या आणखीनच जवळ राहता यावं यासाठी काही जण आपापल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे शेतजमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी फार्म हाऊसेस बांधून राहायला येताना दिसत आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीला आता सोन्याचा भाव मिळू लागला आहे. १९८० च्या दशकात याच तालुक्यात आंतरराष्ट्रीय आय.टी. पार्क उभं राहण्यास सुरुवात झाली. तसेच पिरंगुट परिसरात उभी राहिलेली एमआयडीसी, यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण होताना दिसत आहे. याकरिता या परिसरातील शेतजमिनी व डोंगरराने मोठ्या प्रमाणात संपादित करून त्या ठिकाणी बांधकामे होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुळशी तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात एकेकाळी हिरव्यागार असणाऱ्या डोंगरावरील वनराई कमी होऊन त्या जागी सिमेंटची जंगले उभा राहताना दिसत आहेत. भौतिक विकासाच्या नावाखाली व स्वत:च्या स्वार्थापायी का होईना शहरातील माणूस खेड्याकडे येताना दिसत असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे काही दुष्परिणामही दिसू लागले आहेत. मुळशीचे निसर्गसौंदर्य, पर्यावरण व तेथील जीवसृष्टी अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने मागील वर्षीच ताम्हिणीचा हजारो हेक्टरचा परिसर आता ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
- प्रदीप पाटील

 

Web Title: Fundamental fundamentalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.