ट्रेडिंग केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो सांगत ११ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 16, 2023 18:14 IST2023-08-16T17:31:54+5:302023-08-16T18:14:09+5:30
दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मिळवू शकता असे आमिष दाखवून एकाची फसवणूक...

ट्रेडिंग केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो सांगत ११ लाखांची फसवणूक
पुणे : क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मिळवू शकता असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरुण दीप श्रीवास्तव (वय-३८, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीवास्तव यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ऑनलाईन क्रिप्टो करंसीची ट्रेडिंग केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो. दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवून केवायसी करण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईट तयार करून त्यावरून क्रिप्टो ट्रेडिंग कशी करतात याची माहिती दिली.
ट्रेडिंगसाठी पैसे भरण्यास सांगून तसेच अकाउंट सिल्वर पॅकेजमध्ये अपग्रेड करून देतो, आणखी कालावधी वाढवून देतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्व्हिस मिळवून देतो अशी वेगवेगळी कारणे सांगून एकूण १० लाख ८० हजार रुपये उकळले. मिळालेला नफा विड्रॉल होत नसल्याने त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणू आपली फसवणूक झाल्याचे श्रीवास्तव यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.