चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्का

By Admin | Updated: December 18, 2014 04:43 IST2014-12-18T04:43:13+5:302014-12-18T04:43:13+5:30

जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

Fourteen gang blocks against | चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्का

चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्का

पुणे : जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायमच राहिलेले आहे. ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडून गेल्या वर्षभरात तब्बल १४ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, मोक्का लावण्यात आलेल्या ९८ गुन्हेगारांपैकी ६९ गुन्हेगारांना गजाआड केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
रस्त्यांवरील जबरी चोऱ्या, दरोडे यांसोबतच स्थानिक गुन्हेगारीमध्ये आता बदल होऊ लागले आहेत. ‘तेलमाफियां’च्या कारवायांमुळे ग्रामीण पोलिसांच्या कायमच नाकी नऊ येत राहिलेले आहेत. देहूरोड, चाकण, तळेगाव आदी भागांतील ‘ब्लॅक आॅईल’ माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी हालचालीही केल्या होत्या. परंतु पुणे शहराची व्याप्ती झपाट्याने वाढल्यानंतर शहरालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. जागोजाग शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या जाऊ लागल्या आहेत. या व्यवहारांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसाही खुळखुळू लागला आहे. यातूनच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले आहे.
वरचढ होत चाललेल्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्याचा (मोक्का) कारवाईचा आधार घेतला. गेल्या अकरा महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. तर, पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांनी तीन टोळ्यांचा मोक्का नाकारला. तीन टोळ्या तपासावर आहेत. जबरी चोरी, दरोडे टाकण्याऱ्यांपासून ते खून, खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांपर्यंत सर्व गुन्हेगारांना मोक्काचा लगाम घालण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचेही लोहिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fourteen gang blocks against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.