पुणे :हडपसर भागातील रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या सहा टाक्यांपैकी चार टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आकाशवाणी, ससाणेनगर, काळे बोराटेनगर आणि सातववाडी या भागात केवळ एक तास पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, अशी आग्रही मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल विभागाने केली आहे.हडपसर भागातील पाणीप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, सचिन नेमकर, ऋषिकेश रणदिवे, पल्लवी सुरसे आदी यावेळी उपस्थित होते.
सुरसे म्हणाले, हडपसर येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने येथील विविध भागांमध्ये पाण्याच्या सहा टाक्या बांधल्या आहेत. मात्र जलवाहिनी न जोडणे, काम अर्धवट ठेवणे, यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित ही कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. हडपसर गावठाण, गाडीतळ हा भाग गेल्या ६० वर्षांपासून महापालिकेत आहे. तर सातववाडी, गोंधळेकर, काळे बोराटेनगर हा भाग १९९७ पासून महापालिकेत आहे. पण, आजही या भागात पुरेसे पाणी मिळत नाही. स्थानिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
टाक्या बांधल्या; पण पाणीच येत नाही
हडपसर परिसरातील तुकाईनगर येथे ३५ लाख लिटर, हडपसर बस डेपो येथे ४५ लाख लिटर, भुजबळ स्कीम येथे ३५ लाख लिटर, आकाशवाणी येथे ३५ लाख लिटर क्षमतेच्या दोन आणि साधना विद्यालय येथे ४५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. यातील चार टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. पण त्यामध्ये पाणीच येत नसल्याने रहिवाशांना पाणी मिळत नाही.