खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:01 IST2021-01-07T22:00:29+5:302021-01-07T22:01:20+5:30
संबंधितांनी खोटा दस्तऐवज खोटे जागामालक म्हणून फसवणूक केल्याचे निदर्शनास

खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
वाघोली : आव्हाळवाडी येथील जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (रा. क्लोवर हिल्स, कोंढवा) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भैरवनाथ बाबुराव साळुंखे (वय ३२ रा. कोरेगाव पार्क) योगेंद्र रघुनाथ खिस्ते (वय ३८, रा. विमान नगर) संदीप सेवकराम बस्तानी (वय ३८, रा. लोणकर वस्ती मुंढवा) सुदेश संभाजी राव (वय ३४, रा. पिंपळे गुरव) यांना ताब्यात घेतले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील येथील गट क्रमांक १२३५ मध्ये विकत घेतलेले एकूण चार एकर क्षेत्र व त्यामधील फार्महाउस नागपाल यांच्या भावाच्या नावावर आहे. मात्र काहीजण या जागेवर साफसफाई करीत असल्याची माहिती कळल्यावर नागपाल यांना चौकशी केली असता संबंधित जमीन अपूर्व नागपाल व इतरांकडून विकत घेतली असून चेकने ईसार पावती म्हणून एक कोटी रुपये दिल्याचे व उर्वरित साडेसहा कोटी रुपये खरेदीखताच्या दिवशी देणार असल्याचे समजले. मात्र आपणच अपूर्व नागपाल असून याआधी कधीच आपली भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधितांनी खोटा दस्तऐवज खोटे जागामालक म्हणून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने नागपाल यांनी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांना वाघोली येथून अटक केली असून अधिक तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, दत्ता जगताप, अनिल काळे, गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांनी केली आहे.तर पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत.