पीएमआरडीए उभारणार चार कचरा प्रकल्प : किरण गित्ते 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 03:50 PM2018-09-18T15:50:28+5:302018-09-18T16:01:14+5:30

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ५५ ते ६० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या पाच वर्षांचा विचार करता पुणे शहराची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

Four Garbage Project creating by PMRDA: Kiran Gitte | पीएमआरडीए उभारणार चार कचरा प्रकल्प : किरण गित्ते 

पीएमआरडीए उभारणार चार कचरा प्रकल्प : किरण गित्ते 

Next
ठळक मुद्देएमआयडीसींमधील आरक्षित जागेचा विचार करणारप्रत्येक प्रकल्पासाठी जवळपास अंदाजे ५० एकरपेक्षा अधिक जागा लागणार मेट्रो, रिंगरोड, पाणी, टाऊन प्लॅनिगबरोबरच कचऱ्याच्या प्रश्नांवर पीएमआरडीए ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार

पुणे : पुणे शहरात रस्ते, वाहतूककोंडी बरोबरच कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. याबाबत येत्या काही काळात उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहराच्या चारही बाजुला चार कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागा प्रामुख्याने या प्रकल्पासाठी आपण घेण्याचा विचार करत असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ५५ ते ६० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या पाच वर्षांचा विचार करता पुणे शहराची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. सध्या पुणे शहरातील सर्व कचरा फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये जमा केला जातो. मात्र तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि जागेची उपलब्धतता पाहता आपल्याला पर्याय निर्माण करावे लागणार आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थ सातत्याने आंदोलन, मोर्चे काढत आहेत. यापार्श्वभूमीवर शहराच्या कचऱ्याच्या प्रश्नाबरोबर शहरालगच्या पीएमआरडीएच्या हद्दीतील गावांमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. उपनगरांमध्ये किंवा शहरातून बाहेर जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्यावरच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे. यातून कचऱ्याच्या प्रश्नांबरोबर आरोग्याच्या, रोगराईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 
मेट्रो, रिंगरोड, पाणी, टाऊन प्लॅनिगबरोबरच कचऱ्याच्या प्रश्नांवर पीएमआरडीए ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी पुणे शहराच्या बाहेर पीएमआरडीएच्या हद्दीतील जागेत प्रामुख्याने हे चार कचऱ्याचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी जवळपास ३० हेक्टर जागा (अंदाजे ५० एकरपेक्षा अधिक जागा) जागा यासाठी लागणार आहे. तसेच दोन डोंगराच्या आसपासची जागा मात्र एमआयडीसीसाठीची आरक्षित असलेल्या जागेचा यासाठी विचार करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याबरोब लवकरच बैठक घेऊन त्यांचे सहकार्य या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे. 
........................
पीएमआरडीए मेट्रोची फाईल वित्त विभागाला सादर
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटरच्या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम आॅक्टोंबरमध्ये सुरू होणार आहे. सध्या मेट्रोची फाईल कार्यकारी समितीकडे पाठवली आहे. त्यानंतर राज्याच्या वित्त विभागाकडे ही फाईल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महामेट्रोच्या मेट्रोबरोबर पीएमआरडीएची मेट्रो धावणार आहे. त्यादृष्टीने काम वेगाने करण्याचे आदेश टाटा-सिमेन्स या कंपनीलाा देण्यात आले आहे. या कंपनीला मेट्रो डेपोची जागा तसेच इतर सर्व बाबींचा ताबा आधीच देण्यात आला आहे.
.................
हायपरलूपचा प्रस्ताव मुंबई आयआयटी अभ्यासणार 
कमी कालावधीत पुणे-मुंबईचा प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारने ‘हायपरलूप’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्याचा मनोदय केला आहे. त्यादृष्टीने ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या करारान्वये पुण्याहून नवी मुंबई विमानतळमार्गे मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. काही महिन्यांपूर्वी हायपरलूप वनच्या टीमने पुणे आणि मुंबईतील काही ठिकाणांची पाहणी केली होती. त्या वेळी, मुंबईला जाण्यासाठी तीन वेगवेगळ्या पर्यायी मार्गांची चाचपणी, तर पुण्यात शिवाजीनगर परिसरामध्ये हायपरलूपचे स्टेशन करता येऊ शकते, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली होती. सध्या मुंबई आयआयटी या हायपरलूपचा प्रस्ताव अभ्यासणार असून, पुढील काही महिन्यांत आपल्याला त्यांच्या अभिप्रायबाबतचा सविस्तर अहवाल सादर करणार आहे, असे किरणे गित्ते यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Four Garbage Project creating by PMRDA: Kiran Gitte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.