ट्रॅक्टर चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलासह चौघांना अटक
By Admin | Updated: July 4, 2017 03:28 IST2017-07-04T03:28:34+5:302017-07-04T03:28:34+5:30
चार महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथून दोन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह

ट्रॅक्टर चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलासह चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : चार महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथून दोन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण मात्र अजून फरारी आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : या संदर्भात तालीब मिठू तांबोळी (वय २३, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), सुमीत राजू सोनटक्के (वय १९, रा. वडकी, ता. हवेली) व विजय सुभाष खवले (वय २८ रा. नेर, ता. खटाव, जि. सातारा) व एक अल्पवयीन मुलगा अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले होते, तर प्रमुख सूत्रधार मयूर उत्तम मोडक हा फरारी आहे.
तालीब तांबोळी, सुमीत सोनटक्के व विजय खवले या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी दिलीप रामचंद्र काळभोर (वय ३५, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, फुरसुंगी रेल्वेस्थानकाजवळ) यांनी फिर्याद नोंदविली आहे.
बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले व हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी या गुन्ह्यासंदर्भात लोणी काळभोर पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या कामी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हवालदार बाळासाहेब गव्हाणे, समीर चमन शेख, रॉकी देवकाते या पोलीस पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने पाचपैकी चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. तसेच, ट्रॅक्टरही ताब्यात घेतला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब गव्हाणे करत आहेत.
दिलीप काळभोर यांच्या घरासमोर लावलेला ट्रॅक्टर १० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास या टोळीने चोरून नेला होता. मयूर उत्तम मोडक याच्या सांगण्यावरून तालीब तांबोळी, सुमीत सोनटक्के व एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी सदरचा ट्रॅक्टर लंपास केला होता.
हा ट्रॅक्टर चोरून नेऊन त्यांनी विजय खवले याच्या ताब्यात दिला होता.