खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:15 IST2018-06-20T13:01:12+5:302018-06-20T13:15:03+5:30
कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान एका खड्ड्यात मुंडके धडापासून वेगळे केलेला मृतदेह सापडला आहे.

खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह
पुणे : खून केल्यानंतर मुंडके धडापासून वेगळे करून मृतदेह खड्ड्यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे़. हा मृतदेह कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान सापडला आहे. या मृतदेहाचे मुंडके शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास राऊत (वय ५३, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी) यांना सायंकाळी साडेचारच्या सुमारास खडी मशिन चौक ते मंतरवाडी या रस्त्यावर बालाजी हॉटेलजवळ एका खड्ड्यात मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरुषाचे मृतदेहाचे डोके गायब असल्याचे लक्षात आले.
हा खून सुमारे चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. तसेच हा मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्यात आल्याने कुत्र्यांनी लचके तोडून खाल्ला आहे. खड्डयातील मृतदेह जेसीबीने बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे मुंडके कापुन नेण्यात आले आहेत. या मृतदेहाचे मुंडके शोधण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. हा मृतदेह या भागात राहणाऱ्या मजुराचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़