जगातील सर्वांत उंच शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरमध्ये होणार- माजी आमदार शरद सोनवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:53 PM2023-09-12T20:53:20+5:302023-09-12T20:53:57+5:30

शरद सोनवणे यांच्या घोषणेचे स्वागत : डॉ. अमोल कोल्हे...

Former MLA Sharad Sonwane said tallest statue of Shivaji Maharaj in the world will be built in Junnar | जगातील सर्वांत उंच शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरमध्ये होणार- माजी आमदार शरद सोनवणे

जगातील सर्वांत उंच शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरमध्ये होणार- माजी आमदार शरद सोनवणे

googlenewsNext

नारायणगाव (पुणे) :छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा बसविण्यात येणार असून, एका वर्षात हा पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) शरद सोनवणे यांनी केली. चाळकवाडी येथील राजगड या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शरद सोनवणे बोलत होते. यावेळी प्रदीप देवकर, प्रदीप चाळक, दर्शन फुलपगार, अविनाश करडिले, अक्षय कुटे आदी उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले की, संपूर्ण जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरात राज्यातील राजपिंपळा शहराच्या जवळ असलेल्या नर्मदा धरणाजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा आहे. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्याजवळ खासगी जागेत वर्षभरात उभारण्यात येणार आहे. हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकार्पण करून मेंटेनन्ससाठी सरकारच्या ताब्यात दिला जाईल. जगाला या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल. लोकवर्गणी अथवा खासगी लोकांच्या मदतीने की ठरावीक लोकांच्या मदतीने हा पुतळा उभारावा यासाठी लवकरच एक समिती तयार करण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला काय नाव द्यावे? यासाठी जनतेमधून टॅग लाइन मागविण्यात येणार आहे. २९ तारखेला चार मोठ्या घोषणा होणार आहेत. त्यातील शिवरायांच्या पुतळ्याची घोषणा आज जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित तीन घोषणा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खर्च, जागा यांची माहिती येत्या २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असे सांगून तीन घोषणांबाबत सोनवणे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

भीमाशंकर येथे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतची माहिती दिली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून शासन आपल्या पाठीशी उभे आहे, आपल्याला जी मदत लागेल ती सर्व उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन शिवरायांच्या पुतळ्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल आपले अभिनंदन केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

शरद सोनवणे यांच्या घोषणेचे स्वागत : डॉ. अमोल कोल्हे

सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पुतळ्याची माहिती दिली, त्यावर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज श्वास आहेत, ध्यास आहेत.. पंचप्राण आहेत! जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याच्या केलेल्या घोषणेचे स्वागत करतो. या शिवकार्यात शिवजन्मभूमीचा ‘मावळा’ म्हणून सदैव सहकार्य आणि साथ असेल!”

सोनवणेंच्या घोषणेकडे तालुक्याचे लक्ष

माजी आ. शरद सोनवणे यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यापासून संपूर्ण जुन्नर तालुक्यात फ्लेक्स लावून ‘२९ सप्टेंबर २०२३ - सर्वांत मोठी घोषणा होणार!’ असे जाहीर केले आहे. नेमकी काय घोषणा होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. घोषणेबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. या तर्कांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधले जाणार का? शरद पवार ३० सप्टेंबरला जुन्नर तालुक्यात येणार असल्याने शरद सोनवणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? गरिबांना घरे बांधून देणार का? दाऱ्या घाटाला मंजुरी मिळाली का? बिबट सफारीची अंतिम मंजुरी जाहीर होणार आहे का? यापैकी ३ घोषणा कोणत्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Former MLA Sharad Sonwane said tallest statue of Shivaji Maharaj in the world will be built in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.