गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: May 16, 2025 00:22 IST2025-05-16T00:20:39+5:302025-05-16T00:22:35+5:30
Foreign liquor seized in Goa: गोवा राज्यातील निर्मिती व विक्रीची परवानगी असलेल्या दारूचे ३०५ बॉक्स व सहाचाकी वाहनासह ५२ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गोव्यातील २५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; ‘एक्साइज’च्या पथकाची पिंपरी येथे कारवाई
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क: गोवा राज्यातील निर्मिती व विक्रीची परवानगी असलेल्या दारूचे ३०५ बॉक्स व सहाचाकी वाहनासह ५२ लाख २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुण्याच्या ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या (एक्साइज) ‘जी’ विभागाने पिंपरी येथील वल्लभनगर बसस्थानकाजवळ महामार्गावर गुरुवारी (दि. १५) ही कारवाई केली.
विशाल सुकलाल वराडे (३१, रा. भुसावळ, जि. जळगाव), असे अटक केलेल्याचे नव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील वल्लभनगर बसस्थानकाजवळ राज्य उत्पादन शुल्कच्या ‘जी’ विभागातर्फे वाहनाची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान एका वाहनातून दारुची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने एका सहा चाकी वाहनास थांबवून तपासणी केली.
गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याच्या रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे एकूण ३०५ बॉक्स मिळून आले. २७ लाख ४० हजार रुपये किमतीच्या वाहनासह मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. या मद्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठीची किंमत २४ लाख ८८ हजार ८०० रुपये इतकी आहे. वाहनासह ५२ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
एक्साइजच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जी’ विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक अभय औटे, बी. जी. रेडेकर, गणेश पठारे, कर्मचारी प्रमोद पालवे, विजय घंदुरे, अमोल कांबळे, प्रिया चंदनशिवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
परराज्यातील निर्मित व विक्रीच्या मद्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल चुकविला जातो. अशा प्रकारची कारवाई या एक्साइजकडून वेळोवेळी याअधीही केलेली आहे. ही कारवाई या पुढेही चालू राहील, अशी माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.