कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:52 IST2019-12-20T19:51:46+5:302019-12-20T19:52:09+5:30
बँकेचा व्यवसाय नेणार ४० हजार कोटींवर

कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल
पुणे : बँकेवर झालेला सायबर हल्ला हा अत्यंत दुर्देवी होता. त्यामुळे बँकेच्या सायबर सुरक्षेवर भर दिला जाईल. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच, बँकेची उलाढाल पुढील पाच वर्षांत ४० हजार कोटींवर नेण्यासाठी कटीबद्ध असल्याचे कॉसमॉस बँकेच्या सहकार पॅनेलचे उमेदवार तथा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले.
सहकार पॅनेलचे उमेदवार तथा माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, अॅड. श्रीपाद पंचपोर, राजीव साबडे, डॉ. स्मिता जोग, अॅड. जयंत शालिग्राम उपस्थित होते. गोयल म्हमाले, गेली पंचवीस वर्षे मतदारांनी सहकार पॅनेलला साथ दिली आहे. अशीच साथ ते यावेळी देखील देतील. गेली काही वर्षे बँक काहीशी अडचणीत होती. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यातील रक्कम तोटा म्हणून दाखवावी लागली. या रक्कमेची दोन वर्षांत तरतूद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिले होते. त्यामुळे लाभांश देखील देता आला नाही. येत्या आर्थिक वर्षात सदस्यांना लाभांश दिला जाईल. तांत्रिक सुरक्षेत वाढ, लांभांश, गुणवत्तापूर्ण कामाची हमी आणि कर्मचारी प्रशिक्षण या मुद्द्यांवर मतदारांना सामोरे गेलो.
‘सहकार आयुक्त म्हणून काम करताना आरबीआयसह नागरी बँकांचे कामकाज जवळून पाहता आले. या ज्ञानाचा उपयोग बँक आणि समाजाला देखील होईल, असे वाटल्याने संचालकपदाच्या निवडणुकीत उभा राहिले असल्याची प्रतिक्रिया माजी सहकार आयुक्त दळवी यांनी दिली.
--
बँकेवरील सायबर हल्ला दुर्देवी आहे. बँकेची सुरक्षा सक्षम करण्यावर भर दिला जाईल. भविष्यात अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊ. पुढील पाच वर्षांत बँकेची उलाढाल २६ हजार कोटींवरुन ४० हजार कोटींवर नेऊ.- कृष्णकुमार गोयल, माजी अध्यक्ष आणि सहकार पॅनेल उमेदवार