धान्य बाजाराने दिली भाववाढीची ‘हमी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:18 IST2018-07-07T15:08:42+5:302018-07-07T15:18:56+5:30
हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली.

धान्य बाजाराने दिली भाववाढीची ‘हमी’
पुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीकांना चांगला भाव देण्याची हमी देताच स्थानिक धान्य बाजारात धान्याचे भाव वाढले. तांदळाच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० आणि डाळींच्या भावात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ पोहोचली आहे.
केंद्र सरकारने भात, तूर, मूग आणि उडीद डाळीसह १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ अर्थातच खरीप हंगामाचे पीक बाजारात आल्यानंतर लागू होणार आहे. हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली.
तूरडाळीच्या दरात प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५ हजार ८०० ते ६ हजारांवर गेले आहे. मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ते ६ हजार ७०० ते ७ हजार आणि उडीद डाळीचे भाव २०० ते तीनशे रुपयांनी वाढून ४ हजार २०० ते ५ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहेत. या डाळींचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचे भाव दोनशे रुपयांनी वाढून, ते ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर गेले असल्याची माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली.
बासमती आणि अकरा-एकवीस या जातीच्या तांदळाच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती तांदळाचा प्रतिक्विंटल भाव ९ ते ९ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. कोलम तांदूळ दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढून ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. आंबेमोहोरच्या भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा प्रतिक्विंटलचा भाव साडेपाच ते साडेसहा हजार रुपयांवर गेला आहे. सर्वाधिक खप असलेले सोनामसुरी, मसुरी आणि कोलम तांदळाच्या भावात वाढ झाली नसल्याचे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
भाताच्या हमीभावात वाढ केल्याने झालेली ही तात्पुरत्या स्वरुपाची वाढ आहे. मात्र, बाजारात तितकीशी मागणी नसल्याने ही दरवाढ टिकणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.