नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 09:19 PM2019-08-04T21:19:12+5:302019-08-04T21:20:54+5:30

खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत असल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला असून अनेक झाेपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

flood water entered in slum areas ; hundreds of people shifted to near schools | नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर

नदीच्या पुराचे पाणी झाेपडपट्ट्यांमध्ये ; शेकडाे कुटुबांचे स्थलांतर

Next

येरवडा : आळंदी रस्त्यावरील मुळा नदीकिनारी असलेल्या आदर्श इंदिरानगर, भारत नगर, शांतीनगर इत्यादी झोपडपट्टीतील शेकडो घरांमध्ये रविवारी (दि. ४) पहाटे तीनच्या सुमारास शेकडो घरांमध्ये या नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पुराचा तडाखा बसलेल्या कुटुंबांचे पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 

पुणे महापालिका अथवा जलसंपदा विभागाने मुळा नदीला पाणी वाढण्याची कुठलीही सुचना नागरिकांना दिलेली नव्हती. तसेच नदीकडेच्या कुटुंबाचे नदीला पाणी वाढण्याआधी स्थलांतर करण्याबाबत खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे पहाटे तीनच्या सुमारास झोपेत असताना घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार बुडाले असून अन्नधान्य, कागदपत्रे व इतर चीजवस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेकडो कुटुंबांचे पालिकेच्या वि.द. घाटे व डॉ. नानासाहेब परूळेकर विद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तर ७० ते ८० कुटुंबाना 'एअरपोर्ट' रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात निवारा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. 

आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक सुनील टिंगरे, खडकी कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक अभय सावंत, माजी नगरसेवक सुनील गोगले, आयुब शेख, विजय सावंत यांनी याठिकाणी भेट दिली व नागरिकांची विविध प्रकारे मदत केली. पालिका शाळांमध्ये स्थलांतरित नागरिकांना नाष्टा व जेवणाची व्यवस्थाही लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे. 

जगदीश मुळीक म्हणाले, बाधित नागरिकांना योग्यठिकानी स्थलांतरीत करण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते करत आहोत.याबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांशी बोलून नुकसानभरपाई देण्याबाबत प्रयत्नशील आहे. 

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त विजय लांडगे म्हणाले, या नागरिकांचे सकाळापासून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पालिकेच्या शाळा व सभागृहात नागरिकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. तसेच पाणी वाढण्याची वाट न पाहता पुराची झळ पोहचण्याची शक्यता असलेल्या उर्वरीत नागरिकांचेही स्थलांतर करण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. 

दरम्यान शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीमधील सुमारे 200 झाेपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. या भागात काही वर्षांपूर्वी नदीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यात आली हाेती. परंतु यंदाच्या पावसामुळे मुळा नदीच्या पुराचे पाणी भिंत ओलांडून झाेपड्यांमध्ये शिरले. कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. शेकडाे झाेपड्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानाचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. ताडीवाला राेड येथील झाेपड्यांमध्ये देखील पाणी शिरले. 
 

Web Title: flood water entered in slum areas ; hundreds of people shifted to near schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.