दिल्लीतील धुक्यामुळे पुण्यातून होणाऱ्या उड्डाणांना उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:36 IST2025-12-17T17:35:04+5:302025-12-17T17:36:10+5:30
- दिल्लीला जाणाऱ्याा दहा विमानांना झाला उशीर

दिल्लीतील धुक्यामुळे पुण्यातून होणाऱ्या उड्डाणांना उशीर
पुणे : राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. त्यामुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री दिल्लीला जाणाऱ्या विमानांना दोन ते चार तास उशीर होत आहे. मंगळवारी रात्री पुण्याहून दिल्लीसाठी उड्डाण करणाऱ्या दहा विमानांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवीन टर्मिनल सुरू झाल्यापासून पुण्यातून विमान उड्डाणांची संख्या वाढले आहे. सध्या पुण्यातून दररोज २०० हून अधिक उड्डाणे होत आहेत. यातील सर्वाधिक उड्डाणे हे राजधानी दिल्लीसाठी होतात. त्यानंतर बंगळुरू शहराचा क्रमांक लागतो. सध्या दिल्लीमध्ये दाट धुके पडत आहे. त्यामुळे विमान उड्डाणे आणि लँडिगवर परिणाम होताना दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री बारा ते सकाळी सातपर्यंत पुण्याहून दिल्लीसाठी जाणाऱ्या दहा विमानांना एक तासापासून चार तासांपर्यंत उशीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पुणेविमानतळावरून रात्रीची उड्डाणे सर्वाधिक आहेत. त्यामुळे साहजिक रात्री प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे; परंतु धुक्यामुळे विमानाच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
धुक्याचा मनस्ताप
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ‘इंडिगो’ची सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पुण्यातून ५० ते ६० उड्डाणे रद्द होत होती. आता ‘इंडिगो’ची सेवा पूर्वपदावर येत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे; परंतु रात्री पडणाऱ्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होत आहे. त्यामुळे विमान प्रवाशांचा प्रवास हा गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे.