मुळेवाडीत सदनिकेला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:21+5:302020-12-05T04:17:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: शहरातील मुळेवाडी रस्ता येथील एका सदनीकेला आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत ...

मुळेवाडीत सदनिकेला लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: शहरातील मुळेवाडी रस्ता येथील एका सदनीकेला आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. सदनिका मालक बाळकृष्ण शास्त्री पुणेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी धाडसाने आग विझवली. मच्छिंद्र हिंगे या युवकाने जीव धोक्यात घालून गॅस सिलेंडरच्या दोन टाक्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मंचर शहरातील मुळेवाडी रस्ता येथे असणाऱ्या मैत्री पार्क सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावरील बाळकृष्ण शास्त्री पुणेकर यांची सदनिका आहे. तिला दुपारी अचानक आग लागली. या आगीत सदनिकेतील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने सदनिकेत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेमुळे नागरिकांची धांदल उडाली. सदनिकेच्या खिडकीमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. इमारतीतील दुकानदारांनी दुकाने बंद केली. तर शेजारील सदनिकाधारक भीतीने इमारती बाहेर पडले. आग लागल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. येथे व्यवसाय करणाऱ्या मच्छिंद्र हिंगे या युवकाने जीवाची पर्वा न करता सदनिकेत असणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दोन टाक्या बाहेर काढल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महेश महाराज, राम भक्ते, दत्ता दिघे, बाबाजी दाभाडे व इतर युवकांनी परिसरात असणाऱ्या दुकानातील अग्नि प्रतिरोधक फवारणीद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली.
फोटोखाली: मंचर शहरातील गजबजलेल्या मुळेवाडी रस्त्यावरील एका सदनीकेला आग लागली होती.