पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत; पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड

By श्रीकिशन काळे | Updated: December 10, 2024 17:38 IST2024-12-10T17:35:37+5:302024-12-10T17:38:04+5:30

संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.

First Rotary District Marathi Literary Conference in January; Election of Panipatkar Vishwas Patil as President | पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत; पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड

पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत; पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड

पुणे : मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे औचित्य साधत मराठी भाषा वाढावी व मराठीच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे तसेच ती प्रवाहीत रहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन करण्यात आले आहे. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रांतपाल ३१३१ शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

शनिवार, दि. ४ आणि रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांच्या उपस्थितीने हे संमेलन लक्षवेधी ठरणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.

जागतिकीकरणाच्या काळात भाषाविषयक आव्हाने, त्यावरील उपाययोजना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहित्य विश्वात होणारे फायदे-तोटे अशा विविध कळीच्या मुद्द्यांबद्दल ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक विचारवंतांची मते, ठोस भूमिका चर्चासत्रांच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमासह प्रसिद्ध संगीत नाटकाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे कविसंमेलन विशेष आकर्षण ठरेल असा विश्वास आहे. संमेलन सर्वांसाठी खुले असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, असे संमेलनाचे संयोजक, रोटेरियन राजीव बर्वे यांनी कळविले आहे.

Web Title: First Rotary District Marathi Literary Conference in January; Election of Panipatkar Vishwas Patil as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.