"आधी राजीखुशीने लग्न, नंतर मर्डर; हे योग्य आहे का?" 'लव्ह जिहाद'वर मंगलप्रभात लोढांचा सवाल
By राजू इनामदार | Updated: February 17, 2025 16:54 IST2025-02-17T16:54:11+5:302025-02-17T16:54:43+5:30
राजीखुषीने लग्न केले तर काही नाही, मात्र आधी लव करायचे व मग मर्डर करायचा हे बंद व्हायला हवे

"आधी राजीखुशीने लग्न, नंतर मर्डर; हे योग्य आहे का?" 'लव्ह जिहाद'वर मंगलप्रभात लोढांचा सवाल
पुणे: ‘लव जिहाद’चा कायदा करण्यात काय गैर आहे? राजीखुशीने लग्न करतात त्यांचे काही नाही, पण लव करून मग मर्डर करतात याला काय अर्थ आहे? त्याला आळा घालण्यासाठी कायदा आहे, असे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. अशा कायद्यासाठी जैन समाजाचा आग्रह आहे, या टीकेत काहीही तथ्य नाही, असे ते म्हणाले.
औंध आयटीआयमधील एका कार्यक्रमासाठी आले असताना कार्यक्रमानंतर लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लव जिहाद कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ती अभ्यास करून आपला अहवाल सादर करेल. हा कायदा जैन किंवा कुठल्या विशिष्ट समाजासाठी केला जात नाही. सर्वच समाजासाठी हा कायदा आहे. राजीखुषीने लग्न केले तर काही नाही, मात्र आधी लव करायचे व मग मर्डर करायचा हे बंद व्हायला हवे. प्रेम सर्वच समाजासाठी आहे, कुठल्या एका समाजासाठी नाही. महिला व कुुटुंब कल्याण मंत्री असतानाही आपण या कायद्यासाठी आग्रही होतो, असे ते म्हणाले.
भाजपच्या सदस्यता नोंदणीचे काम भाजपच्या एका मंत्र्यांनी खासगी कंपनीला दिले, असा आरोप होतो आहे. ते मंत्री तुम्हीच असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता, लोढा यांनी त्याचा इन्कार केला. जे आरोप करतात त्यांनी समोर येऊन त्याचा पुरावा द्यावा किंवा कोणी केले त्यांचे नाव सांगावे. त्यांनी काहीही आरोप करावा व तुम्ही प्रश्न विचारावा, हे काही योग्य नाही, असे लोढा म्हणाले.
राऊतांविषयी मला बोलायचे नाही
मुंबईतील एक बँक बुडाली त्याचे सर्व सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. बँक बुडवणारेही संघाचेच आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर राऊत यांच्याविषयी मला काहीच बोलायचे नाही. संघाचा व त्या बँकेचा काहीही संबंध नाही. सरकार बँकेची चौकशी करेल, कायदेशीर कारवाई होईल. यात संघाचे नाव कुठे येते, असे लोढा म्हणाले.