उजनीच्या अवकाशात झेपावले अग्निपंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 08:24 PM2018-04-30T20:24:16+5:302018-04-30T20:24:16+5:30

तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित ऊर्फ फ्लेमिंगो पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत.

The firefly flown in the sky at ujani | उजनीच्या अवकाशात झेपावले अग्निपंख

उजनीच्या अवकाशात झेपावले अग्निपंख

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा परप्रांतीय व वाळू व्यावसायिकांचा त्रास...

न्हावी : लाल-गुलाबी रंगाच्या अग्निपंखांनी उजनीच्या अवकाशात झेप घेतली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास संपवून रोहित पक्षी उजनीच्या आश्रयाला आले आहेत. त्यामुळे आपसूकच पक्षीप्रेमी, पर्यटक व हौशी छायाचित्रकारांची पावले उजनीच्या दिशेने वळाली आहेत. 
तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत. डिकसळ पूल, भिगवण, तक्रारवाडी, पळसदेव, शिंदेवस्ती आणि खादगाव या ठिकाणी सध्या रोहित ऊर्फ फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत आहे. जवळपास चारशे ते पाचशेच्या संख्येने हे पक्षी दाखल झाले आहेत. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना ‘अग्निपंख’असेही संबोधले जाते. हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो. या पक्ष्यांचे थवेच्या थवे असल्याने पाण्यात त्यांच्या जणू काही कवायती चालल्याचा भास होतो. 
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा होता. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे यंदा पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती. त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. उजनी धरण साखळीतील पाणीसाठा कमी झाल्याने मागील सात-आठ दिवसांपासून चारशे-पाचशेच्या आसपास फ्लेमिंगो पाणलोट क्षेत्रात दाखल झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन रोहित पक्ष्यांच्या सुंदर ‘कवायती’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. रोहित पक्ष्यांचे आगमन उशिरा झाले असले, तरी या ठिकाणी सीगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तूतवार तापस आदी जातींचे पक्षी दाखल झाल्याने उजनीकाठ चांगलाच बहरून गेला आहे. राज्यातील पर्यटकांना पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. 

पक्ष्यांच्या होतात शिकारी....
उजनी जलाशयात विणीच्या हंगामासाठी शेकडो जातींचे लाखो पक्षी दाखल होतात. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी पक्ष्यांची शिकारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षी भक्ष्य पकडण्याचा प्रयत्न करीत असतात, त्या वेळी काही हौशी पर्यटक आणि मच्छीमार जाळी लावून अथवा फासे टाकून त्यांची शिकार करतात. अशांवर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमी करीत आहेत. 

परप्रांतीय व वाळू व्यावसायिकांचा त्रास...
उजनी जलाशयात मासेमारी चालते. यामध्ये परप्रांतीय मच्छीमारांकडून पक्ष्यांची शिकार करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे याच परिसरात यांत्रिक बोटीच्या साह्याने वाळू काढण्याचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे बोटींच्या कर्णकर्कश आवाजाने; तसेच बोटींसाठी वापरण्यात येणारे आॅईल पाण्यात पडण्याने पाणी प्रदूषणाच्या समस्येमुळेदेखील पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झालेला आहे.

Web Title: The firefly flown in the sky at ujani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.