गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:41 IST2018-03-26T21:41:45+5:302018-03-26T21:41:45+5:30
वाढत्या तापमानामुळे मोकळ्या जागी ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईन साहित्याने अचानक पेट घेतला.

गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग
पुणे : मोकळ्या जागी एका बाजूला ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याला सोमवारी संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीचे स्वरूप तीव्र असले तरी अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने पोचल्याने पुढील अनर्थ टाळला.
शहरातील कोंढवा भागात संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. कोंढव्यातील पृथ्वी सोसायटीजवळ असलेल्या रस्त्यावर ही आग लागली होती. घटनेची वर्दी मिळताच तात्काळ जाऊन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गॅस साहित्याऐवजी गॅस पाईपलाईनला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ उडाला होता. प्रत्यक्षात गॅस पाईपलाईन साहित्य जळाल्याचे लक्षात आले. वाढत्या तापमानामुळे पाईपने पेट घेतला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. शहरातील तापमानाने ३८ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला असून त्यामुळेच वस्तू अचानक पेट घेत असल्याचे सांगण्यात येते.