पवनानगर - मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पवन मावळ परिसरातील शिवली गावच्या हद्दीतील खडकवाडी येथे अचानक लागलेल्या आगीत एक घर आणि शेजारीच असलेला जनावरांचा गोठा पूर्णतः जळून खाक झाला आहे. शुक्रवारी (दि. १३) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिवली येथील दत्तू गणपत ठाकर यांचे हे घर तसेच रामदास जाधव यांचा हा गोठा होता. रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागल्याने घर आणि गोठा दोन्ही आगीत भस्मसात झाले आहे. घरामध्ये केवळ वयस्कर आजी या एकट्याच असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून घरातून बाहेर धाव घेतली. त्यामुळे त्यांचा जीव बचावला व सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु घराचे बांधकाम हे लाकडी असल्याने घरासह घरातील सर्व साहित्य त्यामध्ये ३०-३५ पोती धान्य, संसारपयोगी वस्तू, घराच्या नूतनीकरणासाठी आणलेले लोखंडी व सिमेंटचे पत्रे, दागिने महत्वाची कागदपत्रे हे सर्व जळून खाक झाले आहे. यासह गोठ्यातील दोन जनावरे ही देखील होरपळून निघाली आहे. त्यामुळे पीडितकुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाने मदतीसाठी प्रशासनाला हाक दिली आहे.
वडील रात्री कीर्तनासाठी गेल्याने आई घरात एकटीच होती. काल रात्री नऊच्या सुमारास घरामध्ये अचानक आग लागली. या आगीत आमचे घर संपूर्ण जळाले आहे. तसेच आमची दोन जनावरे देखील भाजली आहे शेजाऱ्यांच्या मदतीने जनावरे व आई बचावली. परंतु घर जळाल्याने घरासोबत आमचा संसार उघड्यावर पडला आहे. घराचे मोठे नुकसान झाले. त्यासोबत इतर संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला मदत करावी, ही आमच्या कुटुंबाची अपेक्षा आहे. अशी माहिती सतिश दत्तु ठाकर यांनी दिली आहे.