सुनेच्या हत्तेची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:42+5:302020-12-06T04:10:42+5:30
चाकण : सुनेच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. खेड ...

सुनेच्या हत्तेची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला संपवले
चाकण : सुनेच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वराळे (ता. खेड) येथे ३० नोव्हेंबरला मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी नियोजनबद्ध तपास करून ही घटना उघडकीस आणली. या प्रकरणी
दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. खुनाची सुपारी घेऊन सुनेचा खुन न केल्याने सुपारीचे पैसे परत मागितल्याने चिडलेल्या मारेकऱ्यांनी सासऱ्याचा खुन केला आहे.
विनायक भिकाजी पानमंद (वय ६५, रा.शिंदे, ता.खेड ) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर तरवसीम जब्बार, मोहंमद शहाजा इस्लाम उर्फ छोटू (दोघेही रा. मुंगेरी, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अविनाश बबन राठोड (रा. जिंतूर, जि. परभणी) हा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानमंद हे सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या शिंदे येथील घरातून दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाही. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास वासुली ते चाकण रस्त्यावरील वराळे गावच्या हद्दीत विनायक यांचा मृतदेह आढळला. मृतदेहा शेजारीच त्यांची दुचाकी आढळून आली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पानमंद कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार येथील पोलिसांनी अधिक सखोल चौकशी करून तांत्रिक बाबीच्या आधारे वसीम जब्बार, मोहंमद, शहाजा इस्लाम उर्फ छोटू (दोघेही रा. मुंगेरी, बिहार) यांना अटक केली. तर अविनाश बबन राठोड ( रा. जिंतूर, परभणी) हा फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मारेकऱ्यांकडे चौकशी केली असता, विनायक पानमंद यांनी आपल्या सुनेच्या हत्येची वरील तिघांना सुपारी दिली होती. मात्र, ते काम मारेकरी पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे पानमंद हे त्यांच्याकडे परत पैसे मागत होते. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी संगनमताने त्यांचा गळा आवळून खून केला.