...अखेर रिंगरोडसाठी मावळ तालुक्यातील पाच गावांचा दर झाला निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 21:22 IST2022-03-03T21:22:33+5:302022-03-03T21:22:43+5:30
पुढील पंधरा दिवसांत पहिले खरेदी खत होण्याची शक्यता

...अखेर रिंगरोडसाठी मावळ तालुक्यातील पाच गावांचा दर झाला निश्चित
पुणे : पुणे शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणा-या रिंगरोडसाठी अखेर मावळ तालुक्यातील पाच गावांसाठी दर निश्चित झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवार (दि.3) रोजी पहिली बैठक पार पडली. यामुळे पुढील पंधरा दिवसांत रिंगरोडसाठी पहिले खरेदी खत देखील होण्याची शक्यता व्यक्त केली. स्वच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या तब्बल पाचपट मोबदला दिला जाणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम भागातील रिंगरोडसाठीची जमिन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर दर निश्चिती केली जाते. दर निश्चिती करताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रचंड खबरदारी घेतली असून, सर्व तांत्रिक गोष्टी बारकाईन तपासणी करून घेण्यात आली. समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी तीन दिवसांची समृद्धी महामार्गासाठी काम केलेल्या काही प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी पुण्यात येऊन कार्यशाळा घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से या पाच गावांचे दर निश्चित झाले आहेत. आता पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खरेदी खत करण्यास सुरुवात देखील होईल.
असा होणार रिंगरोड
भोर : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे
हवेली : रहाटावडे, कल्याण, चेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली.
मुळशी : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.
मावळ : पाचणे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से