पुणे जिल्ह्यात पावणेसहा हजार मतदार शतायुषी; सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड मतदारसंघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:56 AM2024-03-27T09:56:01+5:302024-03-27T09:56:20+5:30

१० मतदार हे १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शंभरी पार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड विधानसभा मतदारसंघात आहेत....

Fifty-six thousand voters in Pune district; Maximum 613 voters in Kothrud Constituency | पुणे जिल्ह्यात पावणेसहा हजार मतदार शतायुषी; सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड मतदारसंघात

पुणे जिल्ह्यात पावणेसहा हजार मतदार शतायुषी; सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड मतदारसंघात

पुणे : पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशा वैशिष्ट्यांनी पुणे शहर ओळखले जाते. निवृत्तीनंतर अनेक जण पुण्यात स्थायिक होण्यास पसंती देतात. मालमत्ता आणि सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांमधून ही बाब वारंवार स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच पुणे जिल्ह्यात शंभरी पार केलेले तब्बल पावणेसहा हजार मतदार आहेत. त्यातील १० मतदार हे १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शंभरी पार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड विधानसभा मतदारसंघात आहेत.

नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यात आलेले बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक होतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगार अशा सर्वार्थाने सोयीचे असल्याने राज्यातील आणि देशभरातील नागरिकांचा पुण्याकडे ओढा असतो. पुण्याची हवा आल्हाददायी असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून पुण्याला पसंती मिळते.

राष्ट्रपतींपासून अनेक लष्करी अधिकारी, सनदी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर पुण्याला निवडले आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ५ हजार ७५४ इतकी आहे. त्यातील १०० ते १०९ वयोगटांतील मतदार ५ हजार ७४४, तर ११० ते ११९ वयोगटांतील मतदार २२ आहेत, तर १२० हून अधिक वयाचे उमेदवार १० आहेत.

१२० पेक्षा अधिक वयाचे १० मतदार :

जिल्ह्यातील २१ मतदारासंघांपैकी १०० ते १०९ वयोगटांतील सर्वाधिक ६१३ मतदार एकट्या कोथरुड मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल ५२६ मतदार कसबा मतदारसंघात आहेत, तर इंदापूर मतदारसंघात ३९४ मतदार आहेत. ११० ते ११९ या वयोगटांतील उमेदवारांमध्ये कोथरुड व पुरंदर मतदारसंघात प्रत्येकी ५ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १, पर्वतीमध्ये २, तर वडगाव शेरी मतदारसंघात १ मतदार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पुणे जिल्ह्यात १२० पेक्षा जास्त वयोमान असलेल्या १० मतदारांमध्ये ५ मतदार खेड आळंदी मतदारसंघात आहेत. शिरुर, इंदापूर, भोसरी, हडपसर व कसबा पेठ मतदारसंघात प्रत्येकी १ मतदार आहे.

शंभरी पार केलेले मतदार विधानसभानिहाय :

जुन्नर ३४५, आंबेगाव ३९१, खेड आळंदी १०३, शिरुर ३४५, दौंड १७५, इंदापूर ३९५, बारामती १७३, पुरंदर २९६, भोर १९८, मावळ २३०, चिंचवड २१९, पिंपरी १६४, भोसरी २१२, वडगाव शेरी २६९, शिवाजीनगर १२८, कोथरुड ६१३, खडकवासला २४७, पर्वती ३५८, हडपसर १२१, पुणे कॅन्टोन्मेंट २४४, कसबा पेठ ५२७ एकूण ५ हजार ७५४ मतदार आहेत.

Web Title: Fifty-six thousand voters in Pune district; Maximum 613 voters in Kothrud Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.