कर्वेनगर - शिक्षणाची ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही व त्याची स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय चैनही पडत नाही हेच खरे. आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणापासून वंचित राहणारे व वयाचा आलेख वाढत जाणाऱ्या परंतु; जिद्द मनात बाळगून त्याचा शेवट करणारे कमीच. याचेच एक उदाहरण म्हणजे यंदा दहावीत वयाच्या ४९व्या वर्षी चिकाटीने अभ्यास करून अग्निशमन दलातील जवान तुकाराम शिंदे यांनी ६१.२०% गुण मिळविले.जवान शिंदे हे चव्हाणनगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी सन १९७४ च्या जवळपास हिरे विद्यालय, पर्वती येथे नववीपर्यंत शिक्षण घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडली. परंतु, शाळा सोडल्याची खंत त्यांच्या मनात कायमच होती. नंतर अग्निशमन दलाकडे फायरमन या पदावर नोकरी मिळवली. त्यानंतर नोकरी, प्रपंचामुळे शिक्षण घेणे जमले नाही. परंतु, अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन दहावीचा अर्ज भरण्यास सांगितले. त्यांनी ही लगेच शिक्षणाची गोडी म्हणून अर्ज भरून अभ्यास सुरू केला व विशेष म्हणजे नोकरी, प्रपंच व उत्तम आरोग्य सांभाळत त्यांनी दहावीत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच मित्रमंडळी आणि कुटुंबीय त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.जवान कैलास शिंदे म्हणाले, माझे दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले. या यशात माझ्या परिवाराचा मोठा हातभार आहे. तसेच माझी आता पुढे बारावी करण्याची व नंतर पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
पन्नाशी गाठणारा अग्निशमन जवान दहावीत उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 02:46 IST