पुणे : महिलेने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याविरोधात आरोप गंभीर आहेत. जामीन झाल्यास ते तक्रारदार व साक्षीदाराला धमकावू शकतात. त्यामुळे आरोपींना जामीन देता येणार नाही, असे नमूद करत गणपती विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग व लैंगिक छळ करणाऱ्या ढोल-ताशा पथकाच्या दोन सदस्यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी फेटाळला.
अनोज बबन नवगिरे (वय ३४, रा. मंगळवार पेठ) आणि चिराग नरेश किराड (२४, रा. लाल देऊळ सोसायटी) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. त्रिताल ढोल-ताशा पथकाचे सदस्य असलेल्या या आरोपींविरोधात विनयभंग, लैंगिक छळवणूक आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, वीस वर्षाच्या महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात ते पावणे आठच्या दरम्यान बुधवार चौकात घडली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी जामीन मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. त्याला सहाय्यक सरकारी वकील अमर पंढरीनाथ ननावरे यांनी विरोध केला. आरोपींना जामीन मिळाल्यास ते तक्रारदार व साक्षीदारांना धमकावू शकतात. या प्रकरणात महिलेला संरक्षण देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपींनी महिलेला ढकलले; तसेच तिच्या मित्रावरही हल्ला केला. त्यामुळे आरोपींच्या हेतूविषयी वेगळे चित्र निर्माण करतो, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.