पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 11:07 IST2021-11-23T11:07:35+5:302021-11-23T11:07:42+5:30
अज्ञात महिलेने तिच्या अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासून माहिती लपवून ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडून दिले आहे

पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु
चाकण : एसटी बस स्थानकाजवळ नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आढळून आले. याबाबत त्या अर्भकाच्या नातेवाईकांचा चाकण पोलीस कसून शोध घेत आहेत. सुजित अजित काळे ( वय - २४, रा अंगारमळा, आंबेठाण, ता खेड ) या रिक्षाचालकाने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास सुजित व त्याचा मित्र विनोद भगवान हजारे असे चाकण बसस्टँन्ड जवळ रोडवर रिक्षा लावून उभे होते. त्यावेळी येथील एका इलेक्ट्रीक दुकानाशेजारी एका झाडाजवळ नागरिकांची गर्दी दिसली. ते दोघे त्याठिकाणी गेल्यावर एका गोनपाटामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक रडत असल्याचे आढळून आले.
सदर अर्भक हे नुकतेच जन्मलेले असून, तिच्या आजुबाजुला कोणीही दिसून आलेले नाही. अगर तीला कोणी सोडले, याबाबत काही एक माहिती मिळून आली नाही. त्यामुळे त्या दोघांनी सदर अर्भकास रिक्षामध्ये घालून थेट चाकण पोलीस स्टेशनला आणले. सदरचे नवजात स्त्री अर्भकास कोणीतरी अज्ञात महिलेने तिचे अनैतिक संबंधातुन नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासून माहिती लपवुन ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडून दिले आहे. म्हणून अज्ञात महिले विरुद्ध चाकण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.