पित्याने केली आठ महिन्यांच्या मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:38 IST2018-10-20T01:38:10+5:302018-10-20T01:38:20+5:30

चाकण : पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी ...

Father killed eight months old child | पित्याने केली आठ महिन्यांच्या मुलाची हत्या

पित्याने केली आठ महिन्यांच्या मुलाची हत्या

चाकण : पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता. खेड) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. याप्रकरणी बाळाच्या पित्यावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.


ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी पावणेसात ते साडेसातच्यादरम्यान घडली. साहिल चक ऊर्फ राजू सुनार (वय ८ महिने) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी बाळाचा बाप चक ऊर्फ राजू सुरत सुनार (वय २४, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. गाबिश, पो. हात्तीकोट ठाणे सापेगर, जि. आछाम, नेपाळ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रवीण बब्रुवान झुंजार (वय २९, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. कवठळी, जि. सोलापूर) यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : फिर्यादी प्रवीण झुंजार यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत आरोपी राजू व त्याची पत्नी निर्मला आपल्या दोन मुलांसह राहत होते. नवरा-बायकोचे भांडण झाल्यामुळे पत्नी निर्मला शुक्रवारी पहाटे दोन्ही मुलांना पतीजवळ सोडून कोठेतरी निघून गेली. याचा राग मनात आरोपीने आठ महिन्यांचा मुलगा साहिल यास बाथरूमजवळील पाण्याच्या टाकीत टाकून बुडवून त्याचा खून केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सह पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Father killed eight months old child