वडगाव काशिंबेग येथील माळीमळा येथे शेतकरी हिरामण डोके कुटुंबीयांसह राहतात. वरपट्टी नावाच्या शेतात त्यांची विहीर आहे. रविवारी दुपारी पिकांना औषधफवारणी करण्यासाठी तसेच विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी हिरामण डोके हे पत्नी संध्यासह गेले होते. दुर्दैवाने पाय घसरून हिरामण डोके विहिरीत पडले. मोटार ठेवण्यासाठी विहिरीत असलेल्या लोखंडी खांबाला त्यांचे डोके आपटून ते गंभीर जखमी होत पाण्यात पडले. जखमी हिरामण डोके हे पाण्यात बुडाले असता पत्नी संध्या हिने मदतीसाठी आरडाओरडा केला. परिसरात काम करत असलेले सुरेश तारू, बाळशिराम डोके, मारुती डोके, श्रीराम डोके हे मदतीसाठी धावले. सुरेश तारू यांनी पाण्यात उडी मारून तळातून हिरामण डोके यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर येथील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून हिरामण डोके यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. हिरामण डोके यांचा शेती व वाहतूक व्यवसाय होता. त्यांच्या मागे आई-वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. प्राचार्य किशोर डोके यांचे ते बंधू होत.
वडगाव काशिंबेगच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST