मंचर: शेतातील पिकाची पाहणी करत असलेल्या शेतकऱ्यावर आज सकाळी बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.शेतकऱ्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. गणेश सयाजी वाबळे (वय 55 रा. खडकी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांची तीव्रता काहीशी कमी झाली होती. बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता तसेच त्याचे दर्शनही अनेकवेळा झाले होते. त्यातच आज सकाळी खडकी गावात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खडकी गावच्या पांढरी वस्तीवर काळुबाई मंदिराजवळ गणेश सयाजी वाबळे हे राहतात.
घराजवळील शेतात त्यांनी अर्धालिणे गवारीचे पीक घेतले आहे. शेतातील गवार तोडण्यास आली आहे का हे पाहण्यासाठी वाबळे सकाळी सात वाजता शेतात गेले.खाली वाकून गवारीची झाडे ते पाहत असतानाच अचानक समोरून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा बिबट्या शेतालगत दबा धरून बसला होता. वाबळे वाकलेले असल्याने त्यांच्या डोक्यावर बिबट्याने गंभीर जखमा केल्या आहेत. डोक्याच्या मधोमध मोठी जखम झाली आहे. याही परिस्थितीत वाबळे यांनी शेतात पडलेला दगड उचलला व तो बिबट्याच्या दिशेने भिरकावला. तसेच आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.रक्तबंबाळ अवस्थेत गणेश वाबळे घरी गेले. त्यांच्या मुलाने तातडीने त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. दरम्यान डोक्यावर मोठ्या जखमा असल्याने त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले.
सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर डोक्यावर टाके टाकणार आहे. खडकी परिसरात झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश वाबळे हे बिबट्याच्या हल्ल्यात बालमबाल बचावल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.या भागात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार वन खात्याने घटनास्थळी पिंजरा लावला आहे.माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, विशाल वाबळे यांनी जखमी गणेश वाबळे यांची भेट घेऊन विचारपूस केली.
खडकी येथे बिबट्याने हल्ला केलेल्या जागेची पाहणी केली आहे. या भागात बिबट्या अथवा मादी तिच्या पिल्लांसह फिरते आहे का याची शहानिशा करत आहोत.वन विभागाने उपाय योजना सुरू केल्या आहेत.तातडीने पिंजरा लावला आहे. जखमी गणेश वाबळे यांच्या समवेत वनपाल व शीघ्र कृती दलाचे दोन सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. जखमीला सर्वतोपरी मदत केली जाईल.