प्रसिद्ध संगीतकार शंकर यांच्या पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 18:44 IST2018-09-11T18:37:55+5:302018-09-11T18:44:19+5:30
शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला.

प्रसिद्ध संगीतकार शंकर यांच्या पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर
पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेल्या प्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन या द्वयीने बासरीसह अनेक वाद्यांचा संगीतामध्ये वापर केला, त्यातील अत्यंत महत्वाचे पाश्चात्य वाद्य म्हणजे पियानो. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा यांसह अनेक गाण्यांमधील पियानोवरचे दर्दभरे सूर आजही मनामध्ये रुंजी घालतात. याच जोडीतील शंकर यांच्या वैयक्तिक पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया (एनएफएआय)च्या खजिन्यात भर पडली आहे. संगीतकार शंकर यांचे नातू संतोषकुमार यांनी शंकर यांचा पियानो एनएफएआयकडे देणगीस्वरूपात सुपूर्त केला आहे.
शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला. ही गाणी असंख्य चित्रपट रसिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.शंकर जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमध्ये पियानोचा सुरेख वापर करण्यात आला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षे जुना आहे.स्कीडमायर कंपनीच्या या अप्राईट पियानो मध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या ( चाव्या) आहेत. रिदम, मेलडी, ऑर्केस्ट्रेशन यांचा सुमधुर मिलाप करण्यात या संगीतकार द्वयीचा हातखंडा होता. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या असंख्य लोकप्रिय गाण्यांनी १९५०, ६० आणि ७० अशी तीन दशके रसिकांच्या मनावर गारूड निर्माण केले. १९६८ मध्ये केंद्र सरकारने शंकर-जयकिशन या दोघांचाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
शंकर यांचा पियानो एनएफएआयमध्ये जतन करण्यास मिळणे याला विशेष महत्व आहे.ज्यांच्या सूरांमुळे असंख्य गाणी श्रवणीय आणि अजरामर झाली. तो संस्मरणीय पियानो एनएफएआयच्या खजिन्यात समाविष्ट झाल्याबददल एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी संतोषकुमार आणि संदीप आपटे यांच्याबददल कृतज्ञता व्यक्त केली.
-------------------------