प्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यांच्यावर ५ लाख रूपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:00 PM2020-12-09T18:00:45+5:302020-12-09T18:08:21+5:30

तू जर पैसे परत करत नसशील तर मी कायदेशीर मार्गाने पुढे जाईल..

Famous celebrity chef Parag Kanhere alligation in the case of financial fraud of Rs 5 lakh | प्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यांच्यावर ५ लाख रूपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप

प्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यांच्यावर ५ लाख रूपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप

Next
ठळक मुद्देआर्थिक फसवणूक केल्यामुळे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल

पुणे : काही महिन्यांपूर्वी सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे याला आर्थिक मदतीपोटी जवळपास ५ लाख रूपयांची रक्कम दिली होती. त्याने ही रक्कम दोन महिन्यात दररोज एका ठराविक रकमेने पूर्ण परत करण्याचे कायदेशीररित्या लिहून दिले होते. पण त्यातील एकही रक्कम आजपर्यंत दिली नाही. त्यामुळे कान्हेरे याने आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप उद्योजक श्याम देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, पराग कान्हेरे याच्याशी माझी पूर्वीपासून ओळख होती. काही महिन्यांपूर्वी एका व्यवसायानिमित्त त्याचा आणि माझा संबंध आला. यावेळी आपण आर्थिक अडचणीत आहोत. त्यातून  घरगुती अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मला  बाहेर पडण्यासाठी पाच लाख रुपये हवे आहेत. कृपया तू मदत केली तर मी या आर्थिक अडचणीतून बाहेर पडेन.  तुझे उसने घेतलेले पैसे मी दोन महिन्यात परत करेन, अशी त्याने मला विंनती केली. आपण मदत केली तर तो त्यातून बाहेर पडणार आहे. अन शिवाय प्रश्न दोन महिन्यांचा आहे. असा विचार करून मी सुरुवातीला एकूण ४ लाख ८० हजार रुपये ऑनलाईन पेमेंटद्वारे त्याच्या बँक खात्यावर जमा केले.

आमच्या व्यवसायाच्या पत्रकार परिषदेच्या दिवशी पराग याला एका देणेकऱ्याचा फोन आला. तो मला माझे घेतलेले पैसे परत दे नाहीतर पत्रकार परिषदेत येऊन गोंधळ घालण्याची धमकी देत असल्याचे म्हटला.  त्यामुळे पुन्हा त्याने मला अर्जंट ३५ हजार रुपये उसने बँक खात्यावर ट्रान्सफर करण्याची विंनती केली. त्यानुसार मी पराग यांच्या खात्यावर ३५ हजार रुपये गुगल पे केले. त्याने हे सर्व पैसे दोन महिन्यात दररोज एका ठराविक रकमेने पूर्ण परत करण्याचे कायदेशीर  रित्या लिहून दिले. त्यानुसार ७ नोव्हेंबर पर्यंत त्याने ठरल्याप्रमाणे मला सगळे पैसे परत करणे अपेक्षित होते. परंतु त्याने लिहून दिल्याप्रमाणे एकदाही पैसे माझ्या बँक खात्यावर जमा केले नाहीत.  

याबाबत त्याला एका महिन्यानंतर त्याला विचारणा केली असता त्याने मला नुसत्या तारखा सांगितल्या. मात्र पैसे काही परत केले नाही. शेवटी आपण दोघांनी हा व्यवहार कायदेशीरपणे लेखी केलेला असून तू जर पैसे परत करत नसशील तर मी कायदेशीर मार्गाने पुढे जाईल, असे त्याला सांगितले. त्यावेळीही त्याने काहीही प्रतिसाद न देता खुशाल कायदेशीर मार्गाने पुढे जा, असे सांगितले. त्याने माझी आर्थिक फसवणूक केल्यामुळे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
----------------------------------------------------------
 मी मित्रत्वाच्या नात्याने त्याच्याकडे आर्थिक मदत मागितली. मीच कायदेशीर कागदपत्रे तयार करून विशिष्ट वेळेत रक्कम परत करेन असे त्याला लिहून दिले. मात्र व्यवसाय म्हणावा तसा चालला नाही. मी बँकेकडे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला आहे. परंतु त्याला वेळ लागत आहे. तो स्वत: सधन असल्याने काही लाख रूपये तातडीने न मिळाल्याने त्याला तसा काही फरक पडेल असं वाटत नाही. दरम्यान, त्याने आमचीच एक शाखा सुरू केली आहे. किचनसाठी लागणारे सगळे साहित्य माझ्याकडूनच नेले आहे. पण त्याचे पैसे मला दिलेले नाहीत. तो माझं काही ऐकत नव्हता. त्याचा अहंकार आड येत होता. तो अहंकार आणि सूडबुद्धधीने माझी बदनामी करत आहे- पराग कान्हेरे, प्रसिद्ध शेफ
--------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Famous celebrity chef Parag Kanhere alligation in the case of financial fraud of Rs 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.