पुरंदर तालुक्यात बनावट फेसबुक खात्यांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 12:29 AM2019-02-06T00:29:26+5:302019-02-06T00:29:38+5:30

पुरंदर तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा सुळसुळाट झाला आहे.

fake Facebook accounts in Purandar taluka | पुरंदर तालुक्यात बनावट फेसबुक खात्यांचा सुळसुळाट

पुरंदर तालुक्यात बनावट फेसबुक खात्यांचा सुळसुळाट

Next

सासवड - पुरंदर तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा सुळसुळाट झाला आहे. या बनावट खात्यांच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विमानतळ, गुंजवणी, पाणीप्रश्?न, विकासकामे, कर्जमाफी, महामार्गाचे रखडलेले काम, शासकीय निधी आदी प्रश्नांवर आपापसातील मतभेद व हेवेदावे व्यक्त करण्याइतपत मर्यादित असणारे फेसबुकवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे खात्यांवरून आता एकमेकांवर अश्लील भाषेत व आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत राजकीय चिखलफेक करीत असल्याचे दिसत आहे. यातून राजकीय नेत्यांसाह वैयक्तीक मतभेद उघड होत असून मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे कार्यकर्ते एकमेकांची उणीधुणी जाहीरपणे मांडीत असताना पक्षांचे नेते मात्र काहीच बोलत नसल्याने, अशा प्रकारांतून ‘सायबर क्राईम’सह राजकीय गँगवॉर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला आळा कोण घालणार? फेक अकाउंटवरून काँग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांवरदेखील आक्षेपार्ह टीका केली जात आहे.

सोशल मीडियाच्या वापराने सध्या पुरंदर तालुक्यातील प्रत्येक जण स्वयंभू वार्ताहर झाला आहे. फेसबुकवरील बनावट खात्यावरून सहजपणे अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट केल्या जात आहेत. त्याला कोणताही आडपडदा राहिलेला नाही की कुणी सेन्सॉर नाही सोशल मीडियामुळे कोणीही आपल्या मनातील विचार कोणत्याही परिणामांचा विचार न करता फेसबुकवर पोस्ट करित आहे.
बनावट खात्यावरून केले गेलेल्या या पोस्टला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही दिला जातो, हा मिळणारा प्रतिसाद व प्रत्युत्तर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असते. सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व मोठा विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती ही या माध्यमात आहे.

सोशल मीडिया हा संवादाचा कमी आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा मार्ग काही समाजकंटकांनी शोधून काढला आहे. त्या माध्यमातून एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत.
राजकीय पक्षात काम करताना नेत्यांचे चेहरे जनतेमध्ये कायम चर्चेत असतात, अशा वेळी राजकीय विरोधापोटी त्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करून त्यांची बदनामी करण्याचा व राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच कार्यकर्ता किंवा नेता हा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर होणारे निराधार आरोप व त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक चारित्र्यहनन या गोष्टींची दखल पोलीस प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

या बनावट खात्यांबाबत उपविभागीय अधिकारी भोर विभाग व पोलीस निरीक्षक सासवड यांच्याकडे वारंवार लेखी निवेदने व तक्रारी दिलेल्या असूनही पोलीस प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असून या बाबतीत सर्व प्रकारची माहिती असूनही जाणून-बुजून पोलीस प्रशासन या गंभीर विषयाकडे कानाडोळा का करत आहे? हा ही प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया प्रमुखांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन पोलीस प्रशासनाने एक बैठक आयोजित करून या सोशल मीडियाच्या प्रमुखांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणीही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

तसेच जे बनावट खाती सध्या फेसबुक वर वापरले जात आहे त्यांचा सविस्तर तपास केला जावा व सायबर सेलच्या उच्च अधिकाऱ्यांकडून याबाबत त्वरित व कडक कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
पत्रकारांनादेखील या बनावट खात्यांवरून अश्लील कमेंट, शिव्यांचा भडिमार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. बनावट फेसबुक खाते वापरणारे सराईत बनले आहेत व पोलिसांचा कोणताही धाक त्यांना नाही, असेच एकंदरीत दिसून येत आहे .या बनावट खात्यावर वेळीच कारवाई केली गेली नाही तर भविष्यात सोशल मीडियाच्या शाब्दिक वादांतून पुढे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकीय विरोधापोटी त्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करून त्यांची बदनामी करण्याचा व राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न
केला जात आहे.

Web Title: fake Facebook accounts in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.