Pune Crime: कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 16, 2023 15:31 IST2023-08-16T15:30:28+5:302023-08-16T15:31:14+5:30
कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक...

Pune Crime: कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखांचा गंडा
पुणे : कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगूनसायबर चोरट्यांनी कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांनी अमेझॉन प्राईमचे २८ मार्च २०२३ रोजी सदस्यत्व घेतले होते, मात्र ते चालत नसल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केयरचा नंबर शोधून त्यावर फोन केला. कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर अमेझॉन प्राईम टीव्हीवर दिसण्यासाठी पेन्शनचे खाते चालणार नाही असे सांगून दुसरे बँक खाते देण्यास सांगितले. त्यानंतर अडचण सोडवण्यासाठी ५ रुपये भरावे लागतील असे सांगून महिला फोनवरून पैसे पाठवत असताना रिमोट ऍक्सेसद्वारे महिलेच्या बँक खात्याची खासगी माहिती चोरून त्याचा वापर करत वेगवेगळी ट्रान्झॅक्शन करून परस्पर १ लाख ११ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी सोमवारी (दि.१४) कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.