PMC Election | मतदार याद्या दुरुस्तीसाठी मुदतवाढ; पोलिंग बूथनिहाय होणार मॅपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:10 IST2022-07-06T14:08:44+5:302022-07-06T14:10:27+5:30
प्रारूप मतदार यादीवर तब्बल ४ हजार २७३ हरकती दाखल...

PMC Election | मतदार याद्या दुरुस्तीसाठी मुदतवाढ; पोलिंग बूथनिहाय होणार मॅपिंग
पुणे : महापालिकेच्या निवडणूक विभागाने केलेल्या मतदार याद्या तपासणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याच्या मागणीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिली होती.
महापालिकेच्या ५८ प्रभागांतील प्रारूप मतदार यादीवर तब्बल ४ हजार २७३ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचना प्रत्यक्ष स्थळनिहाय पाहणी करून त्यावर अंतिम निर्णय घेणे ९ जुलैपर्यंत शक्य नसल्याने महापालिकेकडून २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी निवडणूक आयोगाने यासाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पोलिंग बूथनिहाय होणार मॅपिंग
महापालिकेने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विधानसभानिहाय मतदारयाद्यांवरून प्रारूप मतदारयाद्या तयार केल्या आहेत. यात कोणतीही नावे समाविष्ट केली नाहीत अथवा वगळलेली नाहीत. तरीही मतदारयाद्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. त्यामुळे जिथे आक्षेप नोंदविले गेले त्या याद्यांचे विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान बूथनिहाय गुगल मॅपिंग केले जाणार आहे. परिणामी, मतदारांचे नाव योग्य यादी व बूथवर येऊन मतदार यादीबाबतचे आक्षेप दूर होतील, असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.