दोन लाखांच्या बदल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST2021-08-22T04:14:29+5:302021-08-22T04:14:29+5:30
जमीन परत देण्यास नकार देणाऱ्या सावकाराविरोधात गुन्हा जमीन परत देण्यास नकार, सावकाराविरोधात गुन्हा बारामती शहर पोलिसांची कारवाई बारामती ...

दोन लाखांच्या बदल्यात
जमीन परत देण्यास नकार देणाऱ्या
सावकाराविरोधात गुन्हा
जमीन परत देण्यास नकार, सावकाराविरोधात गुन्हा
बारामती शहर पोलिसांची कारवाई
बारामती :२ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये वसूल केल्यानंतर, व्याजाने पैसे घेताना नावावर केलेली जमीन परत करण्यास नकार देणाऱ्या सावकाराला शहर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली अनिल साळुंखे (रा. तांदूळवाडी रोड, बारामती) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल तुळशीराम पवार (रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) या सावकाराविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांना प्रापंचिक अडचणींसाठी २ लाखांची गरज होती. त्यामुळे त्यांचे मूळगाव असलेल्या राजुरी येथील अनिल पवार यांच्याकडून ३ टक्के व्याजाने २ लाख रुपये घेण्यात आले. त्या बदल्यात पवार याने फिर्यादीची ढाकाळे (ता. बारामती) येथील ८५ आर शेतजमीन पाच वर्षांच्या मुदतीसाठी घेतली. पैसे परत केल्यावर जमीन परत करण्याचे आश्वासन त्याने दिले होते. दस्त करतेवेळीच दस्ताच्या खर्चापोटी २० हजार रुपये काढून घेत पवार याने फिर्यादीला ८० हजार रुपये दिले. त्यानंतर पत्नी राणी पवार हिच्या खात्यावरून फिर्यादीचे पती अनिल यांच्या खात्यावर ९० हजार रुपये पाठवले. तसेच मध्यंतरी दहा हजार रुपये रोख स्वरुपात असे १ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. दरम्यान, फिर्यादीने बारामतीत बुकिंग केलेला फ्लॅट रद्द केल्यावर त्याचे मिळालेले अडीच लाख, जळोची येथील प्लॉट विकून त्याचे आलेले ४ लाख रुपये व राजुरी येथील पतीच्या नावे असलेली जमीन विकल्यानंतर ३ लाख रुपये पवार यांना दिले. याशिवाय किरकोळ स्वरुपात अन्य रक्कम असे एकूण १० लाख रुपये ५ एप्रिल २०२० पर्यंत देण्यात आले. त्यानंतर जमीन परत करण्यासाठी पाठपुरावा केला असता आणखी पाच लाख रुपये व्याज द्यावे लागेल असे सांगत त्याने टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.