एकूण २ हजार ३१ प्रभागांतील ४ हजार ९०४ जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ११ हजार ७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बहुतांश उमेदवार तुल्यबळ असले, तरी त्यांंना अपक्षांनी ग्रहण लावून तगडे आव्हान उभे केले आहे. उमेदवारांच्या या मोठ्या संख्येमुळे सत्तासुंदरी कोणाच्या गळ्यांत सत्तेची माळ घालते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शुक्रवार (१५ जानेवारी) रोजी मतदान होत असून, बुधवार (१३ जानेवारी) रोजी प्रचाराची रणधुमाळी संपणार असल्याने, पॅनलप्रमुख आपल्या उमेदवार व कार्यकर्त्यांसह जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शर्त करताना दिसत आहेत. माहितीपत्रके, स्टिकर्स या पारंपरिक प्रचारासमवेत उंट, मोठमोठाले एअर बलुुन्स, मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या व पारंपरिक गाजलेल्या गाण्यांच्या चालींवर रचलेली प्रचाराची गाणी त्याचबरोबर एलईडी स्क्रीन लावून केलेली व करणार असलेली कामे सांगण्याचा प्रयत्न, तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मीडिया, तसेच पारंपरिक वेशभूषेेतील वासुदेव, लोककलावंत, तसेच पथनाट्य यांचा पुरेपूर वापर करून प्रचारांत आघाडी घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. काहींनी प्रचारासाठी सिनेमा, नाटक, तसेच विविध वाहिन्यांवरील मालिकांमधील सुप्रसिद्ध कलावंतांना उतरवले असल्याने प्रचारात रंगत येत आहे.
यापूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले होते. सर्व प्रभागांतील ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी, म्हणून पॅनलप्रमुख प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेंत. यावेळची निवडणूक दिवाळीनंतर आली असली, तरी मतदारराजा आपली निवडणूक दिवाळी चांगली जाणार या अपेक्षेने खूश होऊन पॅनलप्रमुख किंवा त्याचे कार्यकर्ते आपणांकडे कधी येतात, याची वाट पाहत आहेत.