UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:08 IST2025-04-23T09:05:15+5:302025-04-23T09:08:22+5:30
वडील शेतकरी..त्यांच्या पश्चात आईने शेती कसली. माेठा आधार दिला आणि वारंवार मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली.

UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
पुणे : खऱ्या अर्थाने जीवनाला दिशा देणारे वर्ष म्हणजे बारावी. त्यामुळे बारावीत असतानाच मनाचा निश्चय केली की, रात्रीचा दिवस करू, पडेल ते कष्ट करू; पण ‘आएएस’ हाेऊ; पण या वाटेत अनेक संकटे येत गेली. तरीही हरलाे नाही की थकलाे नाही. वडिलांचे छत्र हरवले तेव्हाही धिराने उभा राहिलाे. वडील शेतकरी. त्यांच्या पश्चात आईने शेती कसली. माेठा आधार दिला आणि वारंवार मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली. त्यामुळेच मी आज ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात १९७ व्या रँकने उत्तीर्ण झालाे, असे सांगताना कृष्णा बब्रुवान पाटील याला भरून आलं हाेत. हा संघर्ष ऐकताना अंगावर काटा आला. हा त्याचा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक आहे.
कृष्णा पाटील हा मागील दाेन वर्षांपासून पुण्यातील कात्रज परिसरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत हाेता. तत्पूर्वी एक वर्ष दिल्लीत राहून तयारी केली हाेती. मात्र, पुण्यात अभ्यासाला दिशा मिळाली आणि यशाला गवसणी घालता आली, असे कृष्णा पाटील आवर्जून सांगताे. मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काेदळी गावच्या कृष्णाने जिद्दीच्या जाेरावर आज यूपीएससी क्रॅक केली आहे. त्याचे आजाेबा निवृत्त शिक्षक आणि मुलगा माेठा अधिकारी व्हावा, ही आईची इच्छा या जाेरावर कृष्णा याने यशाला गवसणी घातली आहे.
नांदेड येथील गुरुगाेविंदसिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कृष्णा याने पुढील काळात ‘यूपीएससी’च्या तयारीला पूर्णवेळ दिला. त्याच्या या प्रयत्नांना यश आले आहे. या सर्व यशाची खरी शिल्पकार आई आहे, असे ताे आवर्जून नमूद करत आहे.