पुणे: पुण्यात कर्वेनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात संगीत रसिक आजींनी चक्क दुर्बीण लावून संगीताचा आस्वाद घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महोत्सवाला प्रेक्षक भरुभरुन दाद देत आहेत. अनेक नामांकित कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करत आहेत. पुणेकरही या महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. अशातच या पुणेकर आजींच्या हौशेने सर्वांची जणू काही मनेच जिंकली आहेत.
पंडित अभय सोपोरी हे संतूर वादनातील कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी काल सादर केलेल्या वादनाचा कार्यक्रम इतका रसिकांना आवडला की, सगळ्यांनी उभे राहून दाद दिली. यावेळी यातील एका ज्येष्ठ महिला रसिकांनी दुर्बिणीतून हा कार्यक्रम बघत संगीताचा आस्वाद घेतला. सोशल मीडियावर त्या आजींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या संगीत महात्सवात एका बाजूने पंडित अभय सोपोरी संतूर वादनाची कला सादर करत आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षक ते ऐकण्यात दंग झाल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी संगीत रसिक आजींनी दुर्बीण लावून संगीताचा आस्वाद घेतला. वादनाच्या वेळी सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. सादरीकरणानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रतिसादात सोपोरी यांना भरभरून दाद दिल्याचे दिसून आले आहे.