पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 14:23 IST2019-12-13T14:16:58+5:302019-12-13T14:23:17+5:30
जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती

पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका
पुणे : जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल ७५० ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणुका होणार असून, या ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यात २० डिसेंबरपासून प्रभागरचना आणि आरक्षण निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित तहसीलदाराने गुगलमॅपद्वारे प्रथम गावाचे नकाशे अंतिम करण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ७५० ग्रामपंचायतींसाठी जुलै -ऑगस्ट २०२० मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी या सर्व ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये २० डिसेंबर रोजी गावाचे नकाशे अंतिम करणे, ३० डिसेंबरपूर्वी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे स्थळपाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित करणे, १० जानेवारीला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची नमुना ब प्रसिद्ध करणे, ३० जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे, १ फेब्रुवारी रोजी आरक्षणाची सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देणे, प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे आणि २१ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने अंतिम प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तालुकानिहाय संख्या :
हवेली -५५, आंबेगाव-३०, बारामती-४९, भोर-७४, दौंड-५०, इंदापूर-६१, जुन्नर-६७,मावळ-५७, मुळशी-४५, पुरंदर-६६, खेड-९१, शिरूर-७३, वेल्हे-३१, पिंपरी-चिंचवड-१ एकूण - ७५०.