भोरमध्ये दमदार पाऊस; भातलावण सुरू
By Admin | Updated: July 4, 2017 03:25 IST2017-07-04T03:25:45+5:302017-07-04T03:25:45+5:30
चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील

भोरमध्ये दमदार पाऊस; भातलावण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील भुतोंडे व गुंजवणी खोऱ्यात भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून, यापूर्वी पेरलेल्या बियाण्यांची पावसाने चांगली उगवण होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
तालुक्यात भाताचे एकूण क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून ७०० हेक्टरवर रोपवाटिकांची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी १०० हेक्टर असून, पेरणी ७० हेक्टरवर आहे. (७० %), नाचणी १५०० हेक्टर क्षेत्र असून, रोपवाटिका १३०० हेक्टरवर झाली आहे (८०%). कडधान्य तूर, मूग, उडीद १००० हेक्टर असून, पेरण्या ६०० हेक्टरवर (६०%) झाल्या आहेत. भुईमूग ४००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५०० हेक्टरवर (६०%) पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन ३००० हेक्टर क्षेत्र असून, २२०० हेक्टरवर (७०%) पेरण्या झाल्या आहेत.
भाजीपाला ८०० हेक्टरपैकी १८० हेक्टर (२०%), चारा पीक मका, घास १०० हेक्टर असून पेरणी ५० हेक्टरवर (५०%) झाली आहे.
भाटघर, नीरा देवघर धरण भागातील धूळवाफेवर पेरलेल्या भाताची व गुंजवणी खोऱ्यात लिफ्टच्या पाण्यावर लवकर लावणीला आलेल्या भाताची लागवड सुरू असल्याचे मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण परिसरातील गावात इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ७०० हेक्टरवर भाताची (रोपवाटिका) पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली, तर सध्या पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत असून भाताची खाचरेही पाण्याने तुडुंब भरली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत भाटघरचा साठा कमी
भाटघर धरण भागात आज १५ मिमी, तर एकूण १५९ मिमी पाऊस झाला आहे. धरण १२.३३ टक्के भरले आहे. मागील वर्षी धरण भागात १९३ मिमी पाऊस होऊन धरण २३ टक्के भरले होते, तर नीरादेवघर धरण भागात आज ४३ मिमी तर एकूण ४४० मिमी पाऊस होऊन धरण १५.२५ टक्के आहे. गतवर्षी ३९० मिमी पाऊस होऊन धरण १२.३३ टक्के भरले होते. वीर धरण भागात आज ०, तर एकूण ५५ मिमी पाऊस झाला असून धरण ६.६३ टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरण भागात पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा निम्म्याने कमी आहे, तर नीरादेवघर धरण भागात पाऊस अधिक असून साठाही जास्त आहे. भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने फायदा होणार आहे.