पावसाने ओढ दिल्याने पानवेली जळण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 5, 2014 06:34 IST2014-07-05T06:34:33+5:302014-07-05T06:34:33+5:30
इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या ओढीमुळे नुकतेच बसवलेल्या पानवेली जळण्याच्या मार्गावर आहेत

पावसाने ओढ दिल्याने पानवेली जळण्याच्या मार्गावर
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या ओढीमुळे नुकतेच बसवलेल्या पानवेली जळण्याच्या मार्गावर आहेत. तर उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी घालून जोपासलेल्या डाळींब बागा पाण्याच्या कमतरतेमुळे रोगाला बळी पडण्यास सुरूवात झाली आहे.
जानेवारी, फेब्रवारी महिन्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली. त्यावेळी अनेका शेतकऱ्यांनी पानमळे व डाळींब बागा जगवण्यासाठी आपल्या शेतामध्ये लाखो रूपये खर्च करून तयार केलेली शेततळी सापडेल तेथून पाणी मिळवून भरून घेतली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना आजपर्यत आधार मिळाला. शेतकऱ्यांनी साठवलेले पाणी मार्च महिन्यापासून जूनआखेर वापरले. शेतकऱ्यांची भावना होती की जून महिन्यामध्ये पावसाळा निश्चीत सुरू होतो. एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर पिके जोपासण्यासाठी जास्त त्रास होत नाही. परंतू जून म्हिना संपून जुलै सुरू झाला, तरीही इंदापूर तालुक्यामध्ये अद्याप पावसाने तोंड दाखवले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरामध्ये नेहमीच पाण्याची कमतरता असते. मात्र, या भागातील शेतकरी उत्पन्न मिळवण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. परंतू पाण्यामूळे शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. या वर्षीही याचपध्दतीने शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा विपरित असा परिणाम आर्थिक प्रगतीवर झालेला दिसून येतो.
पानवेलींना बाजारपेठ निमगाव केतकी येथेच असल्याने येथील शेतकरी पानवेली जोपासण्याचा प्रयत्न करतात.
या पिकाकडे बारमाही उत्पन्न देणारे पीक म्हणून पाहिले जाते. या पानमळ्यांच्या मशागतीसाठी खर्च होत असला तरी यापासून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे या पिकाकडे येथील शेतकऱ्यांचा कल पहायला मिळतो. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने या पिकाला मोठा फटका बसत आहे. सद्य:स्थितीमध्ये पाण्याच्या टंचाईमूळे पानमळे जळण्याची भीती निर्माण झाली आहे. पानमळे हे दरवर्षी जानेवरी फेब्रवारीमध्ये बसवले जातात. यामध्ये लांबलेले वेल खाली घेऊन जमिनीमध्ये बसवले जातात. त्यांना खत पााणी घालून मशागत केली जाते. यानंतर दोन महिन्यामध्ये पुन्हा पानवेली उत्पन्न द्यायला सुरूवात होते. परंतू पावसाने ओढ दिल्याने या उत्पन्नाम्ध्ये मोठी घट झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पानाच्या उत्पन्नामध्ये फरक पडला आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे पावसाची ओढ लागल्याने शेतकरी पाऊस पडण्यासाठी परमेश्वराकडे विनवणी करत आहेत.
इंदापुर तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्र कमी झाल. या ठिकाणी डाळींबाच्या बागा तयार झाल्या. गेल्या दोन वर्षामध्ये डाळींब बागांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हतभार लावला. त्यामुळे अनेका शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले. बागांचे क्षेत्र वाढले. पण यंदा पाऊस नाही. (वार्ताहर)