डीएसके यांची आता ईडीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 21:19 IST2018-07-24T21:18:49+5:302018-07-24T21:19:03+5:30
ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे.

डीएसके यांची आता ईडीकडून चौकशी
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी येरवडा कारागृहात जाऊन डीएसके यांची चौकशी सुरू केली. तिघांची चौकशी ३० जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर लेखापरीक्षक सुनील घाटपांडे यांची चौकशी करण्यात येणार आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या फसवणुकीचा प्रकार गंभीर असल्याने त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार आणि सक्तवसुली संचालनालयाला कळविली. त्यानुसार त्यांनी माहिती घेऊन यापूर्वीच चौकशी सुरू केली आहे.
या गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने कंपनी गैरव्यवहार अफरातफरी प्रकरणात केंद्र सरकारच्या सिरियस फॉड इन्व्हेटिगेशन डिपार्टमेंटने यापूर्वी डी. एस. कुलकर्णी यांची चौकशी केली आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता त्यांना प्रत्यक्ष चौकशी करायची आहे. त्यासाठी सक्तवसुली संचालयनालयाचे अधिकारी अजित काटकर, प्रवीण साळुंखे सहका-यांसह पुण्यात आले आहे. त्यांनी शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात ईडीच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने डीएसके यांनी पैशाचा विनियोग कशा पद्धतीने केला याची चौकशी करण्याची गरज असल्याने परवानगी द्यावी, असे या अर्जात म्हटले होते. न्यायालयाने त्यांना २४ ते ३० जुलै दरम्यान कारागृहात जाऊन चौकशी करण्यास परवानगी दिली. लेखापरीक्षक सुनील घाटपांडे यांचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यावर पुणे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, न्यायालय सुनील घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर २६ जुलैला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची चौकशी ३० जुलैनंतर करण्यात यावी, असे सांगण्यात आले. ईडीचे अधिकारी मंगळवारी येरवडा कारागृहात गेले. त्यांनी न्यायालयाचा आदेश दाखवून डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.