डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राला टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST2021-05-05T04:17:06+5:302021-05-05T04:17:06+5:30
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र ...

डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राला टंचाईच्या झळा
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालूवर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे. यामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डिंभे धरणात सध्या केवळ ३८.०९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यावर्षी या भागामधील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते. यामुळे या परिसरातील पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खु., कुशिरे बु., मेघोली, दिगद, बेंढारवाडी ही गावे ओलिता खाली येऊन या भागातील आदिवासी शेतकरी हा उपसा सिंचनाद्धारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला. या पाणलोट क्षेत्रातून पाणी उपसा करून बाजरी, गहू, बटाटे, कांदे, मेथी ,कोथंबीर यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला. परंतु जस-जशी उन्हाळ्याची तीव्रता वाढली तस-तशी डिंभे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तसेच आवर्तनामुळे या वर्षी लवकरच डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र रिकामे झाले आहे. या परिसरात चांगला पाऊन होऊनही येथील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी, इत्यादी उपलब्ध असणारे जलस्त्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही. पाण्यासाठी या भागातील आदिवासी बांधवांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यामध्ये मुसळधार पडणार्या पावसामुळे म्हाळुंगे, कुशिरे दरम्यान असणारा डिंभे धरणाचा मागील बाजूस असणारा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात भरला जातो. त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रामध्ये पाटण, पिंपरी व पिंपरी, म्हाळुंगे हद्दीमध्ये छोट्या छोट्या कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे. त्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून उपसा सिंचन करून या भागामध्ये बागायत पद्धतीची शेती केली जात होती. परंतु गत वर्षापेक्षा चालूवर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला. त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याद्धारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा हा ३८.०९ टक्के एवढा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे पाणलोट क्षेत्र आता रिकामे झाले आहे.
चौकट
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यामध्ये असणाऱ्या सावरली, पिंपरी, साकेरी, नानवडे, ढकेवाडी, मेघोली, बेंढारवाडी गावांच्या अत्यंत हाकेच्या अंतरावर डिंभे धरण आहे. या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करत दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहे. या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व धरणाचा फुगवटा या गावांच्या उशाला असूनही या गावांतील आदिवासी बांधवांना वाटीने झऱ्यातून पाणी टिपावे लागत आहेत.
फोटो : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पाटण खोऱ्यामध्ये असलेले डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यावर्षी लवकरच रिकामा झाला आहे.