दुष्काळासह अवकाळीचे संकट
By Admin | Updated: March 8, 2016 01:08 IST2016-03-08T01:08:58+5:302016-03-08T01:08:58+5:30
परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे

दुष्काळासह अवकाळीचे संकट
वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.
एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे.
मिळणारे उत्पन्न व त्यावरील होणारा खर्च याचा काहीच ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीमधून काहीच उत्पन्न घेता आले नाही. तर अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतातील पिके मातीमोल होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
वडापुरी, अवसरी, सुरवड, काटी, रेडा, रेडणी, वरकुटे, अभंगवस्ती, राऊतवस्ती, पंधारवाडी या परिसरात खरिपाबरोबरच रब्बीचे उत्पादन कमी प्रमाणात निघाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना लागणारा चारा कोठून आणावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. विहिरींनी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. शेतात कामच नसल्याने मजुरांना रोजगारच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(वार्ताहर)कमी दूधदराने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळले होते. परंतु, दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन कमी करण्यात येत आहे. तसेच दुधाला सध्या मिळणारा दरही अल्प आहे. दुधाचा उत्पादन खर्च आणि दूधदरामधील तफावत यामुळे दुग्धव्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुधन बाजारात विक्रीला जात आहे.
भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर
वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे.
भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर
वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे.