पीएमपीच्या ड्रायव्हरचे प्रसंगावधान आणि वाचले अनेकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:29 IST2019-09-24T13:25:50+5:302019-09-24T13:29:08+5:30
:पण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी निरुपयोगी झाली आहे याची चर्चा अनेकदा होत असताना एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो व्यक्तींचे प्राण वाचले आहेत. खरं तर त्या एका घटनेत अनेकांचा काळ आला होता पण चालकामुळे वेळ निभावून गेली असे म्हणल्यास हरकत नाही.

पीएमपीच्या ड्रायव्हरचे प्रसंगावधान आणि वाचले अनेकांचे प्राण
पुणे :पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी निरुपयोगी झाली आहे याची चर्चा अनेकदा होत असताना एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो व्यक्तींचे प्राण वाचले आहेत. खरं तर त्या एका घटनेत अनेकांचा काळ आला होता पण चालकामुळे वेळ निभावून गेली असे म्हणल्यास हरकत नाही.
ही घटना आहे सोमवारची. शहरातील वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सिंहगड रस्त्यावर संध्याकाळी सात वाजता हा थरार घडला. अनेक चाकरमाने घराकडे परतत असताना माणिकबाग चौकातून सुटलेली बस अचानक एका खांबाला जाऊन धडकली. ही बस स्वारगेट येथे जाणार होती. नेमका काय प्रकार घडला बघण्यासाठी प्रवासी, नागरिक आणि वाहतूक पोलीस चालकपाशी गेले तर संबंधित चालक बेशुद्ध होऊन स्टेअरिंगवर पडला होता. सुनील साळवे (वय ५५) असे या कर्तव्यदक्ष चालकाचे नाव आहे.
छातीत जोरदार कळा आणि वेदना सुरु झाल्यावर साळवे यांना काही सुचेनासे झाले. अशा स्थितीत त्यांचा बसवरील ताबाही सुटू लागला होता. परंतु, अशा स्थितीतही त्यांनी तात्काळ स्वतःला सावरत आणि आजूबाजूच्या दुचाकीस्वारांना धक्का न लावता बस एका खांबावर धडकवली. अचानक आलेल्या या घटनेमुळे प्रवाशांनमध्ये भीती निर्माण झाली. त्याच चौकात कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार मोहन मोरे यांनी आणि प्रवाशांनी मिळून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. काहीवेळ कोंडीत अडकलेली वाहतूकही पोलिसांनी सुरळीत केली आणि प्रवाशांनी मात्र चालकाच्या कौशल्याचे कौतुक करत घराची वाट धरली.